Dhurandhar Movie: रणवीर सिंहची बहुचर्चित फिल्म ‘धुरंधर’ पुन्हा चर्चेत आली आहे. आज या चित्रपटाचा दमदार टायटल ट्रॅक रिलीज झाला असून त्यासोबतच ट्रेलर रिलीज डेट चाहत्यांसमोर आली आहे. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’नंतर दिग्दर्शक आदित्य धर या अॅक्शन थ्रिलरद्वारे परत येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. याचसोबत मेकर्सनी चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर केली आहे. 1995 मधील ‘ना दिल दे परदेसी नू (जोगी)’ या पंजाबी गाण्याचं हे मॉडर्न वर्जन असून, चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे. रणवीरसह संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलर 12 नोव्हेंबरला, तर चित्रपट 5 डिसेंबरला थिएटर्समध्ये धडकणार आहे.
‘धुरंधर’चा टायटल ट्रॅक झाला रिलीज
टीझरनंतरच या चित्रपटाबद्दलचा उत्साह वाढला होता. रणवीर सिंहचा खतरनाक लुक पाहून चाहत्यांचे अंगावर काटा आला होता. आज मेकर्सनी याचा टायटल ट्रॅक सादर केला आहे. हा ट्रॅक 1995 मधील मूळ पंजाबी गाणं ‘ना दिल दे परदेसी नू (जोगी)’ चं मॉडर्न वर्जन आहे. ओरिजनल गाणं मोहम्मद सादिक आणि रंजीत कौर यांनी गायले होते. नव्या आवृत्तीत हनुमानकाइंड, जैस्मिन सॅंडलस, सुधीर यदुवंशी आणि शाश्वत सचदेव यांनी आवाज दिला आहे. संगीत शाश्वत सचदेव आणि चरणजीत आहूजा यांचं असून बोल बाबू सिंह मान यांनी लिहिले आहेत.
‘धुरंधर’चा ट्रेलर केव्हा येणार?
टायटल ट्रॅकच्या शेवटीच मेकर्सनी या चित्रपटाच्या ट्रेलरची तारीखही जाहीर केली आहे. रणवीर सिंहच्या या मच अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर 12 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. त्यामुळे आता फॅन्सना त्या दिवशीची आतुरता लागली आहे.
कधी रिलीज होणार ‘धुरंधर’?
या चित्रपटात रणवीरसोबत संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आदित्य धर लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित हा चित्रपट ज्योती देशपांडे आणि लोकेश धर यांच्या संयुक्त निर्मितीत तयार झाला आहे. मोठ्या पडद्यावरचा एक भव्य सिनेमॅटिक अनुभव देण्याचं वचन देणारा ‘धुरंधर’ 5 डिसेंबरला थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
