Raja Bapat Passed Away : ज्येष्ठ अभिनेते राजा बापट (Raja Bapat) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांत आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.
राजा बापट यांच्यावर सोमवारी दुपारी शिवाजी पार्क विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, मुलगी शिल्पा व जावई गिरीश म्हसकर आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.
राजा बापट यांनी बालकलाकार म्हणून मनोरंजसृष्टीत पाऊल ठेवलं. नाटककार रत्नाकर मतकरी (Ratnakar Matkari) यांच्या बालनाट्य संस्थेतून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. 'रंगायन' या संस्थेमार्फत त्यांची रंगभूमीशी ओळख झाली. 'यशोदा' (Yashoda), 'श्रीमंत', 'हमीदाबाईची कोठी'(Hamidabaichi Kothi), 'पप्पा सांगा कुणाचे' (Pappa Saanga Kunache), 'शांतुतल' (Shaakuntal), 'सागर माझा प्राण', 'जन्मदाता', 'शांतता कोर्ट चालू आहे' (Shantata! Court Chalu Aahe) अशा अनेक गाजलेल्या नाटकांत राजा बापट यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
'दामिनी' (Damini), 'वादळवाट' (Vadalvaat), 'या सुखांनो या', 'झुंज', 'समांतर', 'बंदिनी', 'वहिनीसाहेब', 'या गोजिरवाण्या घरात' (Hya Gojirwanya Gharat), 'मनस्विनी', 'अग्निहोत्र', 'श्रावणबाळ रॉकस्टार' आणि 'आम्ही दोघं राजा राणी' अशा अनेक मालिकांमध्ये राजा बापट यांनी काम केलं आहे.
राजा बापट यांचे सिनेमे : (Raja Bapat Movie)
राजा बापट यांनी 'जावई विकत घेणे आहे', 'थोरली जाऊ', 'व्हेंटिलेटर', 'प्रीत तुझी माझी', 'एकटी', 'बाळा गाऊं कशी अंगाई', 'एकटी' आणि 'नवरे सगळे गाधव' अशा अनेक लोकप्रिय सिनेमांत ते झळकले आहेत. 'बाळा गाऊं कशी अंगाई' या सिनेमातील भूमिकेमुळे ते घराघरांत पोहोचले.
राजा बापट यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीदेखील गाजवली आहे. 'ढाई आखर प्रेमके', 'चूप कोर्ट चालू है' या हिंदी नाटकांत त्यांनी काम केलं आहे. तसेच 'वख्त की रफ्तार', 'दुश्मन', 'खोज' या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यासोबत 'बिरबल माय ब्रदर' या इंग्रजी सिनेमातदेखील त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
राजा बापट यांनी मनोरंजनसृष्टीत काम करण्यासोबत युनियन बॅंकेत नोकरी केली आहे. निवृत्तीनंतर त्यांनी दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये विविध उपक्रम राबवले. अभिनयासह त्यांना संगीताचीदेखील आवड होती.
संबंधित बातम्या