मुंबई : संगीत ऑस्कर विजेता,  ए.आर. रहमान सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. बुधवारी त्याने निता अंबानींसोबत त्याच्या पत्नी आणि मुलींचा फोटो शेअर केला होता. त्यात त्याच्या मुलीने बुरखा परिधान केला होता. यावर नेटिझन्सनी त्याला ट्रोल करायला सुरु केलं.


रहमान ने त्याच्या ट्विटर अकांउटवर हा फोटो शेअर केला होता. ज्यावर त्याने लिहिलं होत की, 'निता अंबानी यांच्यासोबत माझ्या कुटुंबातील महिला, खतिजा, रहीमा आणि सायरा. #freedomtochoose' असा हॅशटॅगही त्याने दिला आहे. या फोटोत त्यांची मुलगी खतिजाने बुर्का घातलेला आहे. अनेकांनी या फोटोवर कॉमेंट्स करुन रहमानला ट्रोल केलं आहे. एकाने या फोटोवर कॉमेंट केली आहे, की बुरख्यात कसलं आलं स्वतंत्र ? तर एका नेटकऱ्यांने लिहिलं आहे की, खतिजाने बुरखा घातला आहे मात्र रहीमाने नाही, असं का? तर चेहराच दाखवायचा नव्हता तर फोटोशूटच का केलं ? असा सवाल एकाने केला आहे.


स्लमडॉग मिलिनियर या चित्रपटाला 10 वर्ष पूर्ण झाले आहे. याचेच औचित्य साधून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बॉलिवूडच्या दिग्गजांसह रहमानचे कुटुंबीयही उपस्थित होते. यावेळी रहमानची मुलगी खतिजा आपल्या वडिलांबद्दल आपले मत व्यक्त करताना भावूक झाली होती.

याच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या निता अंबानी यांच्यासोबत रहमानच्या कुटुंबातील महिलांनी फोटो काढला होता. त्यावर नेटकऱ्यांनी रहमानला ट्रोल केलं. एखाद्या सेलिब्रेटीला ट्रोल करण्याची ही पहिली वेळ नाहीये. नुकतेच नृत्य दिग्दर्शिका फराह खान हिने त्याच्या मुलांचा पूजा करतानाचा फोटो शेअर केला होता. यावरुन तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.

तर शाहरुख खान, सलमान खान, भाऊ कदम, क्रिकेटपटू मोहमद कैफ, इरफान पठान यांनाही ट्रोलर्सनी सोडलं नाही.