Panchayat Web Series Jitendra Kumar Net Worth :  'पंचायत' (Panchayat)  आणि इतर वेब सीरिजमधून चर्चेत आलेला अभिनेता जितेंद्र कुमारने (Jitendra Kumar) आपला एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. जितेंद्रने एक युट्युबर म्हणून  आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर जितेंद्रने ओटीटी प्लॅटफॉर्म आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली. आता 'पंचायत' या वेब सीरिजचा तिसरा सीझन रिलीज होणार आहे.  'पंचायत' मधील सचिवजींना या वेब सीरिजसाठी चांगले मानधन मिळाले आहे. जितेंद्रने  पंचायतच्या माध्यमातून किती कमाई केली असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. 


'पंचायत-3' ही बहुप्रतिक्षित वेब सीरिज आहे. या वेब सीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतीच या वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. आता पंचायत 3 ही वेब सीरिज 28 मे रोजी प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे. 


जितेंद्रने पंचायतच्या दोन्ही सीझनमध्ये दमदार सहजसुंदर  अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा तो तिसऱ्या सीझनमुळे चर्चेत आला आहे. जितेंद्रने  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. मात्र कॉलेजच्या दिवसांमध्ये थिएटर केल्यामुळे त्यांचा अभिनयाकडे कल वाढला. द व्हायरल फीव्हर (TVF) सोबत त्याला मोठा ब्रेक मिळाला आणि यासोबतच त्याला ओळखही मिळाली.


'पंचायत'ने दिली नवी ओळख


जितेंद्रच्या अभिनयाच्या करिअरमध्ये   पंचायत ही  वेब सीरिज अतिशय महत्त्वाची ठरली. या वेब सीरिजमध्ये पंकजने अभिषेक त्रिपाठीची व्यक्तीरेखा साकारली आहे. या वेब सीरिजमध्ये एका दुर्गम भागातील गावात पंचायत सचिव म्हणून त्याची नेमणूक होते.  काहीशा नाईलाजाने कॉर्पोरेटमधून नोकरी सोडत सरकारी नोकरीत तो रुजू होतो. या वेब सीरिजमधील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. 


जितेंद्रने किती घेतलं मानधन?


पंचायत या वेब सीरिजसाठी जितेंद्रने चांगलेच मानधन घेतले. एका वृत्तानुसार, पंचायतच्या पहिल्या दोन सीझनसाठी जितेंद्रला प्रत्येक एपिसोडसाठी 50 हजार रुपयांचे मानधन मिळाले. टाइम्स नाऊ नवभारतने दिलेल्या वृत्तानुसार, पंचायत 3 च्या सीझनमध्ये पंचायत सचिव अभिषेक त्रिपाठीची मुख्य भूमिका साकारण्यासाठी जितेंद्रने प्रत्येक एपिसोडसाठी 70 हजार रुपयांचे मानधन घेतले. या शोमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार जितेंद्र कुमार आहे. 


मुंबईत घर, आलिशान कार...


एका वृ्त्तानुसार, जितेंद्रची एकूण संपत्ती ही 7 कोटींच्या घरात आहे. मुंबईत त्याचे स्वत: चे घर आहे. त्याची किंमत कोटींच्या घरात आहे. सोशल मीडियावर अनेकदा तो आपल्या घराचे फोटो शेअर करत असतो. जितेंद्र कुमारकडे मर्सिडीज बेंज जीएलएस  350 डी, मर्सिडीज बेंज ई क्लास आणि टॉयटा फॉर्च्युनर सारखी कार आहे.