Palyad Marathi Movie : मागील बऱ्याच दिवसांपासून अनेक चित्रपट महोत्सवात  पुरस्कार पटकावल्याने चर्चेत आलेला 'पल्याड' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं कथानक, समाजाचं वास्तव दाखवणारा ज्वलंत आशय, कसलेल्या कलाकारांचा लक्षवेधी अभिनय आणि विषयाचं गांभीर्य मनावर ठसवणारं कल्पक दिग्दर्शन या आणि अशा बऱ्याच कारणांमुळे 'पल्याड'बाबत उत्सुकता वाढली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरने 'पल्याड' बाबतची उत्सुकता आणखी वाढवण्याचं काम केलं आहे. प्रदर्शित झाल्यापासून वाऱ्याच्या वेगानं मोशन पोस्टर जनमानसापर्यंत पोहोचत आहे.


निर्माते पवन सादमवार, सुरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी एलिवेट फिल्म्स आणि लावण्यप्रिया आर्टसच्या बॅनरखाली 'पल्याड'ची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून के सेरा सेरा या डीस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून येत्या 4 नोव्हेंबरला 'पल्याड' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. स्मशानजोगी समाजातल्या परिवाराची गोष्ट सांगणाऱ्या 'पल्याड'चं मोशन पोस्टर सर्वार्थानं चित्रपटाची झलक दाखवणारं आहे. हा चित्रपट सत्य प्रथा आणि परंपरेवर आधारीत आहे. आगीचा आगडोंब, जीवाच्या आकांतानं पळणारे माय-लेक, हातात काठ्या घेऊन त्यांच्या मागे धावणारा जनसमुदाय, पुस्तकासोबत विठ्ठल-रुक्मिणीचा फोटा आणि विठ्ठल-विठ्ठल हे वाजणारं गाणं असं चित्र 'पल्याड'च्या मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळतं.



'पल्याड'नं आजवर 12 वा दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल, नवी दिल्ली, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, सिक्कीम, अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिव्हल, मुंबई, नवी दिल्ली फिल्म फेस्टिव्हल, ब्लॅक स्वान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, कोलकाता, कोकण मराठी चित्रपट महोत्सव, या चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कार पटकावले आहेत. याखेरीज सिनेक्वेस्ट व्हीआर अँड फिल्म फेस्टिव्हल युएसए,  इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ साऊथ एशिया टोरंटो, कॅलेला फिल्म फेस्टिव्हल स्पेन, इंटरनॅशनल कॅास्मोपॅालिटन फिल्म फेस्टिव्हल टोक्यो, एशिया आर्ट फिल्म फेस्टिव्हल हाँगकाँग, बॅायडन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल स्वीडन आणि रिचमंड इंटरनॅशनल फिल्म फस्टिव्हल युसए मध्ये चित्रपटाची अधिकृत निवड करण्यात आली आहे. 


या चित्रपटात शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, रुचित निनावे, देवेंद्र दोडके, वीरा साथीदार, सायली देठे, गजेश कांबळे, भारत रंगारी, बबिता उइके, रवी धकाते आणि सचिन गिरी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा सुदर्शन खडांगळे यांनी लिहिली असून, सुदर्शन खडांगळे आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. रवींद्र शालीकराव वांढरे, गौरव कुमार वनिता पाटील, शिवशंकर रवींद्रनाथ निमजे, माया विलास निनावे, लक्ष्मण रवींद्रनाथ निमजे आणि रोशनसिंग बघेल हे सहनिर्माते आहेत. गीतकार प्रशांत मडपुवार आणि अरुण सांगोळे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून, सॅम ए. आर., जगदीश गोमिला आणि तुषार पारगावकर यांनी स्वरसाज चढवला आहे. अनन्या दुपारे, अवधूत गांधी, शमिका भिडे, सुस्मिरता डावलकर आणि केतन पटवर्धन यांनी आपल्या सुरेल गायनाद्वारे गीतांमधील शब्दांना अचूक न्याय दिला आहे. पार्श्वसंगीत मंगेश धाकडे आणि लोकेश कनिथी यांनी दिलं आहे. डिओपी मोहर माटे यांची सुरेख सिनेमॅटोग्राफी आणि मनीष शिर्के यांनी केलेलं संकलन प्रेक्षकांना भावणारं आहे. स्वप्नील धर्माधिकारी यांनी रंगभूषा केली असून, विकास चहारे यांनी वेशभूषा केली आहे. कला दिग्दर्शन अनिकेत परसावार यांनी केलं आहे, तर गिरीश रामटेके यांनी ध्वनी संयोजनाची बाजू सांभाळली आहे.