Akshay Kumar Charge Fees OMG 2 : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. एकीकडे सनी देओल आणि अमिषा पटेलचा (Ameesha Patel) 'गदर 2' (Gadar 2) आणि रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर' (Jailer) बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. तरीही अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. दरम्यान खिलाडी कुमारने 'ओएमजी 2' या सिनेमासाठी मानधन घेतलं नसल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे. 


'ओएमजी 2' या सिनेमाचे निर्माते अजित अंधारे पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले,"अक्षय कुमारने 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमासाठी एकही रुपया घेतलेला नाही. उलट या सिनेमाच्या आर्थिक गोष्टींसाठी अभिनेत्याने मदत केली आहे. अक्षय आणि आमचं खूप चांगलं नातं आहे. 'ओएमजी'सह 'स्पेशल 26' आणि 'टॉयलेट : एक प्रेम कथा' या सिनेमासाठीही अक्षयचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे चांगलं कथानक असेल तर खिलाडी कुमारचा आम्ही सर्वात आधी विचार करतो. 


अजित पंधारे पुढे म्हणाले,"ओएमजी 2' या सिनेमाच्या बजेटबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. या सिनेमाचं बजेट 150 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे पण हे खोटं आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाची फक्त 25 कोटींमध्ये निर्मिती करण्यात आली होती". अक्षयने या सिनेमासाठी 35 कोटी रुपये माधन घेतल्याचं म्हटलं जात होतं. पण आता निर्मात्यांनी अभिनेत्याने एकही रुपये न घेतल्याचा दावा केला आहे.


'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), यामी गौतम (Yami Gautam) मुख्य भूमिकेत आहेत. लैंगिक शिक्षणावर भाष्य करणारा हा सिनेमाला 'ए' सर्टिफिकेट देण्यात आले आहे. त्यामुळे फक्त 18 वर्षांवरील मंडळीच हा सिनेमा पाहू शकतात. 


'ओएमजी 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (OMG 2 Box Office Collection)


'ओएमजी 2' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 10.26 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 15.3 कोटी, तिसऱ्या दिवशी 17.55 कोटी, चौथ्या दिवशी 12.06 कोटी, पाचव्या दिवशी 17.1 कोटी, सहाव्या दिवशी 7.2 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत रिलीजच्या सात दिवसांत सिनेमाने 85.05 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


'ओएमजी 2' हा 2012 मध्ये आलेल्या 'ओह माय गॉड' या सिनेमाचा सीक्वेल आहे. 'ओएमजी 2' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण सेन्सॉरच्या कात्रीत अडकलेल्या या सिनेमाला अखेर हिरवा कंदील मिळाला. एकीकडे 'जेलर' आणि 'गदर 2' हे बिग बजेट सिनेमा असतानाही दुसरीकडे 'ओएमजी 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या कथानकाचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल.


संबंधित बातम्या


Akshay Kumar : ओह माय गॉड... खिलाडी कुमारचा 'OMG 2' फक्त प्रौढांनाच पाहता येणार; नेमकं प्रकरण काय?