Murali Mohapatra Died : ओडिशाचे (Odia) लोकप्रिय गायक मुरली प्रसाद महापात्रा (Murali Mohapatra) यांचे निधन झाले आहे. दुर्गापूजेच्या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर गाणं गात असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
ओडिशाच्या जेपोर शहरात दुर्गापूजेदरम्यान एका लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुरली प्रसाद महापात्रादेखील गाणं म्हणत होते. कार्यक्रमादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशात दुर्गापूजेदरम्यान एका लाईव्ह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुरली प्रसाद महापात्रा एक-दोन गाणी गायल्यानंतर खुर्चीवर बसले होते. त्याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. गेल्या अनेक दिवसांपासून ते मधुमेहाचा सामना करत होते. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. महापात्रा यांचे भाऊ बिभूती प्रसाद महापात्रा यांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त
मुरली प्रसाद महापात्रा यांच्या निधनानंतर ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. ट्वीट करत त्यांनी लिहिलं आहे,"प्रसिद्ध गायक मुरली महापात्रा यांच्या निधनाने मी खूप दु:खी आहे. त्यांचा सूर या आसमंतात सतत निनादत राहो, हीच या पृथ्वीवरच्या सर्व देवी-देवतांना प्रार्थना. त्यांचा मधुर आवाज श्रोत्यांच्या हृदयात नेहमीच आनंदाची भावना निर्माण करेल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."
चाहते केकेच्या आठवणीत
गेल्या काही दिवसांपूर्वी कोलकातातील एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान गायक केके यांचे हृदयविकाराच्या झटकण्याने निधन झाले आहे. केके यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अशातच पुन्हा एकदा लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान मुरली प्रसाद महापात्रा यांचे निधन झाले आहे. त्यामुळे चाहत्यांना केकेची आठवण आली आहे.
संबंधित बातम्या