Nitin Desai Suicide : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे.  नितीन देसाई  यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.


मनसे नेते आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली, 'मला काही सुचत नाहीये. गेल्या काही महिन्यांमध्ये माझं आणि नितीनदादाचं बोलणं चालू होतं. पुण्यात एका फिल्म स्कूलबाबत आमचं बोलणं सुरु होतं. अचानक ही बातमी आली आहे. तो खूप मोठा माणूस होता. चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. दादानं असं का केलं? खूप मोठा धक्का आहे हा'


अमोल कोल्हे म्हणाले, 'हे खूप शॉकिंग आहे. खूप वर्ष आम्हीसोबत काम केलं आहे. फायटिंग स्पिरिट असणाऱ्या माणसाबाबत अशी बातमी ऐकायला मिळणं हे शॉकिंग आहे. मराठी माणसाची मान बॉलिवूडमध्ये त्यांनी उंच केली. आम्ही जवळपास सहा-सात वर्ष एकत्र काम केलं. दादांच्याबाबतीत अशी बातमी समोर येत आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही.'


अभिनेता जितेंद्र जोशीनं सांगितलं,  'तो खूप मोठा व्हिजनरी माणूस होता. मला कळत नाहीये नक्की काय बोलावं. कधीही भरुन न निघणारी ही हानी आहे. कला दिग्दर्शन काय असतं? हे त्यांच्या कामाकडे बघून कळतं.तो दमदार माणूस होता. त्यांना असं का वाटलं असेल? कशामुळे हे घडलं असेल? मला काय बोलावं समजत नाही. कितीतरी आठवणी डोळ्यासमोरुन जात आहेत.'


2005 मध्ये नितीन देसाई यांनी एन.डी.स्टुडिओची स्थापना केली. नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.'1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितीन देसाई यांचे चांगले संबंध होते. नितीन देसाई हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. 80 च्या दशकात नितीन देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. '1942 अ लव्ह स्टोरी' या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. पुढे अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Nitin Desai : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या; एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य