"बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारीत सिनेमात त्यांची भूमिका करण्यासाठी राऊतांनी सांगितल्यावर सुरवातीला विश्वास बसला नव्हता. एखाद्या अभिनेत्याला जितकी आव्हानात्मक भूमिका मिळेल तितका त्याला आनंद होत असतो. त्यामुळे सिनेमात बाळासाहेबांची भूमिका आपल्याला मिळाली याचा मला अतिशय आनंद झाला. बाळासाहेबांची भूमिका साकारणे अत्यंत कठिण होते. बाळासाहेबांना प्रत्यक्ष कधी भेटलो नाही परंतू त्यांचे भाषण, टिव्हीवरील मुलाखती पाहिल्या आहेत", असे नवाजुद्दीन सिद्दीकीने यावेळी सांगितले.
"बाळासाहेब ठाकरेंची भूमिका करतोय हे समजल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. काही जणांनी या भूमिकेबद्दल कौतुक केलं तर काहींनी हे का करतोय? वगैरे असे प्रश्नही विचारले. परंतू इतकी मोठी भूमिका मिळाल्यानंतर कोण काय म्हणतं याकडे माझे लक्ष नव्हते", असे नवाजुद्दीन म्हणाला.
'ठाकरे' सिनेमाचे निर्माते खासदार संजय राऊत यांनी देखील सिनेमाच्या निर्मितीचा प्रवास यावेळी सांगितला. " हा सिनेमा करताना त्यामध्ये बाळासाहेबांची नक्कल करायची नाही असे सुरवातीलाच ठरवले होते. बाळासाहेबांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष लोकांसमोर मांडायचा होता. एखाद्या हॉलीवुड किंवा बॉलीवुड सिनेमाला पडद्यावर जो 'मसाला' लागतो तो सगळा बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यात होता. त्यामुळे सिनेमात वेगळं काही समाविष्ट करण्याची गरज पडली नाही", असे राऊत म्हणाले.
तसेच हा सिनेमा फक्त बाळासाहेबांवर केंद्रीत असला पाहिजे हे सुरवातीपासूनच ठरवले होते. बाळासाहेबांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक लोक येऊन गेले. परंतू इतर कोणावरही लक्ष न देता फक्त बाळासाहेबांवर हा सिनेमा बनवलेला असल्याचे राऊत यांनी सांगितले.
व्हिडीओ :