मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेता कन्नड अभिनेता संचारी विजय (37 वर्ष) याचं सोमवारी, 14 जून रोजी निधन झालं. शनिवारी रात्री बंगळुरूजवळ विजयचा अपघात झाला होता. या अपघातात विजयला डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. सांचारी विजयवर उपचार घेत असलेल्या डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले होते.


विजयचा भाऊ सिद्धेशने सांगितलं की, 'विजयचा मेंदू काम करणे बंद झाला होता. म्हणून आम्ही त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. सांचारी विजय याचा नेहमीच समाज सेवा करण्यावर कल होता आणि म्हणूनच आम्ही त्याचे अवयवदान करत आहोत. शनिवारी रात्री 11.45 वाजता विजयचा अपघात झाला होता. अपघात झालेल्या दुचाकीच्या मागे तो बसला होता. रस्ता ओला असल्यामुळे दुचाकी घसरली. यात विजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर लगेचच त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र अखेर आज त्याचा मृत्यू झाला आहे. 


विजय 2015 मध्ये आलेल्या 'नानू अवनाल्ला अवालू' या चित्रपटात त्याच्या उत्कृष्ट भूमिकेमुळे प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. लॉकडाऊन दरम्यान संचारी विजयने कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था करण्यास मदत केली होती. संचारी विजय याच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. चाहत्यांकडून सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे.