Naseeruddin Shah On PM Modi : बॉलिवूड आणि रंगभूमीवरील दिग्गज अभिनेते नसिरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) हे अभिनयासोबत धीर गंभीर वक्तव्यासाठी ओळखले जातात. या वक्तव्यांमुळे ते वादातही अडकले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लोकसभा निवडणूक निकालावर भाष्य केले. नसिरुद्दीन शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडून असलेली अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांचा द्वेष करत नाहीत हे त्यांनी पटवून देऊ शकले तरी खूप होईल असे नसिरुद्दीन शहा यांनी म्हटले. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी मौलवींनी दिलेली टोपी त्यांनी परिधान केली नाही हे विसरणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले. या मुलाखतीत त्यांनी मुस्लिम कट्टरतावाद्यांनाही फटकारले.
निवडणूक निकालावर काय म्हणाले नसिरुद्दीन शहा?
'द वायर' ला दिलेल्या मुलाखतीत नसिरुद्दीन शहा यांना विचारण्यात आले की, भाजपाला बहुमत मिळाले नाही, त्यांना आघाडीचे सरकार स्थापन करावे लागेल हे स्पष्ट झाल्यानंतर तुमच्या मनात कोणती प्रतिक्रिया उमटली? त्यावर नसिरुद्दीन शहा यांनी म्हटले की, मनाला एक प्रकारचे समाधान मिळाले. मग, स्वत:ला सांगितले की पराभूत झालेले, विजयी झालेले, हिंदू-मुस्लिम, सरकार आणि सगळ्यांसाठीच आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
मोदी अहंकारी आहेत...
नवीन सरकार ही एक नवीन सुरुवात आहे, भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला कोणते बदल अपेक्षित आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नसिरुद्दीन शहा म्हणाले की, मोदींना अनेक प्रकारचे हेडगियर (टोपी) आवडतात. मला त्यांना जाळीदार कॅपमध्ये पाहायचे आहे. मी योग्य मुस्लिम पाहू इच्छितो. मला वाटतं की द्वेष पसरवणारी भाषणे संपली पाहिजेत. मला अधिकाधिक महिलांना संसदेत पाहायचे आहे. मोदी इतके अहंकारी आहेत की ते कधीच मान्य करत नाहीत की त्यांनी चूक केली तर फक्त साधी कृती म्हणून जाळीदार टोपी घालावी.
मुस्लिम कट्टरतावाद्यांना फटकारले...
नसिरुद्दीन शहा यांनी मुस्लिम कट्टरतावाद्यांनाही फटकारले. हिजाब, सानिया मिर्झाचा स्कर्ट यापेक्षा त्यांनी समाजात शिक्षणाचे प्रमाण कसे वाढेल, याची काळजी करावी असेही शहा यांनी म्हटले.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी उपोषण केले होते. हे लाक्षणिक उपोषण संपल्यानंतर समाजातील विविध घटकांनी, धर्मगुरुंनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुस्लिम धर्मगुरू, मौलवींनी त्यांना जाळीदार टोपी दिली होती. ती परिधान करण्यास मोदींनी नकार दिला होता. मोदींनी जाळीदार टोपी परिधान केली असती तर आम्ही वेगळे नाही असा संदेश गेला असता. मुस्लिमही या देशाचे नागरीक आहेत, त्यांच्यासोबत माझे वैर नाही असे मोदींना दर्शवता आले असते असे नसिरुद्दीन शहा यांनी म्हटले.