सोलापुरातील एका छोट्याशा गावातून येऊन, आपल्या लेखणी आणि दिग्दर्शन कौशल्याद्वारे मायानगरीत एक वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या नागराज मंजुळे यांना, नुकतंच एबीपी माझाच्या 'माझा सन्मान' पुरस्काराने गौरवण्यात आलं.
त्यानंतर नागराज यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
" माझ्या कवितेने वाट दाखवत दाखवत मला इथवर आणून ठेवलं आहे. कविता लिहालयला सुरुवात केली, तेव्हा आईचा आणि माझा वाद व्हायचा. आई-वडिलांना कविता कळायची नाही. पण कवितेतून तुला पैसे मिळणार का, असा आईचा प्रश्न असायचा. लहानपणापासून टीका, अपमान सहन करायची शक्ती मिळाली. मला काहीही वाटत नाही, अपमान सहज सहन करु शकतो, पण कौतुक झाल्यावर बिथरतो. याला कसं रिअॅक्ट व्हायचं हे मला कळतच नाही. आता थोडसं सरावाने जमायला लागलंय", असं नागराज म्हणाला.
आमीर खानचा खूप मोठा फॅन
मी आमीर खानचा खूप मोठा फॅन आहे. लहानपणापासून त्यांचं काम पाहात आलो आहे. आज त्यांना भेटलो हे फार मोठं वाटतं. त्यांनी माझ्या कामाचं फोन करुन कौतुक केलं, खूप भारी वाटलं, असं नागराज यांनी नमूद केलं.
ज्या उर्जेपोटी, गरजेपोटी कविता करत गेलो, ती कविता आज आठवली, असं म्हणत नागराज यांनी त्यांची कविता सादर केली.
माझ्या हाती नसती लेखणी,
तर असती छिन्नी, सतार, बासरी अथवा कुंचला,
मी कशानेही उपसतच राहिलो असतो,
हा अतोनात कोलाहल मनातला...
हा कोलाहाल असाच उपसत राहीन, अशी ग्वाही नागराज यांनी उपस्थितांना दिली.
VIDEO:
संबंधित बातम्या
एक उत्तम दिग्दर्शक म्हणून नावा रूपाला आलेल्या नागराज मंजुळेचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या रत्नांना 'माझा सन्मान' !