मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरूखचा मुलगा आर्यन खानचा मुक्काम हा पुढील पाच दिवसांसाठी आर्थर रोड जेलमध्येच असणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टानं आर्यन खानसह अन्य दोन आरोपींच्या जामीनावरील निकाल राखून ठेवला आहे. 15 ते 19 ऑक्टोबर असे सलग पाच दिवस सणासुदीच्या काळातील सुट्यांमुळे कोर्टाचं कामकाज बंद असल्यानं पुढील बुधवारी 20 ऑक्टोबरला यावर निकाल जाहीर करू असं न्यायाधीश वी.वी. पाटील यांनी गुरूवारची सुनावणी संपल्यावर जाहीर केलं. त्यामुळे आर्यन खानसह अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जेलमधील मुक्कामाचा फैसला आता पुढील बुधवारी ठरणार आहे. हे सर्व आरोपी सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत.


दरम्यान एनसीबीनं आर्यनसह तिघांच्याही जामीनाला जोरदार विरोध करत आपला युक्तिवाद संपवला. ड्रग्ज प्रकरणा ही समाजाला लागलेली एक किड आहे. दिवसेंदिवस तरूणपिढी यात ओढली जात आहे. त्यासाठी एनसीबी जे काम करतंय त्याचं कौतुक याचिकाकर्तेही करतायत, पण त्याचवेळी ते एनसीबीवर टिकाही करतायत? हे योग्य नाही. कठोर कारवाई केल्याशिवाय या गोष्टी थांबणार कश्या? असा सवाल उपस्थित करत एएसजी अनिल सिंह यांनी, आपल्या स्वातंत्रवीरांनी या स्वैराचारासाठीच लढा दिला होता का? अशी टीका करत ही महात्मा गांधी आणि गौतम बुद्धांची भूमी आहे याचंही भान ठेवायला हवं, त्यांची नितीमूल्य जपायला हवीत अशी टिप्पणी केली. हा तपास सध्या अगदीच प्राथमिक अवस्थेत आहे, त्यामुळे सध्या कुणालाच जामीन देऊ नये असं त्यांनी कोर्टाला सांगितलं.


आर्यनच्या ड्रग्स प्रकरणाचा शाहरूखच्या डुप्लिकेटलाही फटका; काम मिळणे झाले अवघड


आर्यन खानच्या जामीनास का झाला इतका उशिर?


2 ऑक्टोबरच्या शनिवारी मुंबई पोर्ट टर्मिनलवरील क्रूझवर धाड


3 ऑक्टोबरला रविवारी आर्यनला अटक आणि सुट्टिकालीन कोर्टाकडनं पहिली रिमांड 4 ऑक्टोबरपर्यंत


4 ऑक्टोबरला पुढील तपासासाठी एनसीबीला मिळाली 7 ऑक्टोबरपर्यंत रिमांड


7 ऑक्टोबरला मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टानं आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनावली


न्यायालयीन कोठडी मिळताच आर्यनच्या जामीनाची याचिका सादर करण्यात आली


8 ऑक्टोबरला जामीनावर सुनावणी झाली. मात्र, एनसीबीनं त्यावर आक्षेप घेतला


मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टाच्या कार्यक्षेत्राबाहेरील हे प्रकरण असल्याचा दावा मान्य, जामीन फेटाळला


9-10 ऑक्टोबर शनिवार रविवार असल्यानं कोर्ट बंद


11 ऑक्टोबरला सोमवारी जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात सादर


एनसीबीनं उत्तर देण्यासाठी मागितला आठवड्याचा अवधी, बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे कोर्टाकडून निर्देश


12 ऑक्टोबर काहीही कार्यवाही नाही


13 ऑक्टोबर जामीनावर सुनावणी, याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाला एनसीबीचा जोरदार विरोध


समाजातील प्रतिष्ठा पाहता तो बाहेर आल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो. तसेच आपलं वजन वापरून त्याच्यावतीनं पुराव्यांशी छेडछाड आणि अन्य साक्षीदारांवर दबावही आणला जाऊ शकतो. असा दावा करत एनसीबीनं बुधवारी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. 


आरोपीकडे अमली पदार्थ सापडोत अथवा न सापडोत, एनडीपीएस कायद्यातील कलम 29 नुसार अश्या कटात सामील असणं हा एक गंभीर गुन्हा आहे. तुमच्याकडे ड्रग्ज नाही जरी सापडले तरी जेव्हा एनडीपीएस कायद्यातील कलम 29 लावलं जातं तेव्हा आरोपी मुख्य सुत्रधाराइतकाच दोषी असतो असं एनसीबीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला सांगितलं. 


14 ऑक्टोबर दुपारी 12 वाजता पुन्हा सुनावणी होणार होती


मात्र, एएसजी अनिल सिंह अन्य खटल्यात हायकोर्टात व्यस्त असल्यानं ही सुनावणी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी सुरू झाली


दुपारी 4 वाजून 45 मिनिटांनी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे निकाल राखून ठेवला


15 ते 19 ऑक्टोबर कोर्ट सणासुदीच्यानित्तानं बंद असल्यामुळे निकाल पुढील आठवड्यात बुधवारी दिला जाईल.


न्यायाधीश वी.वी. पाटील हे किमान 8-10 दिवस निकालवाचनासाठी घेतात, अशी त्यांची आजवरची कार्यपद्धती आहे.



आर्यन खानचे वकील अमित देसाईंच्या युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे -


आर्यनकडे कोणताही अमली पदार्थ सापडलेला नाही


तो क्रूझवर चढलाही नव्हता, टर्मिनलवरच त्याला ताब्यात घेण्यात आलं


त्याची अरबाझसोबत केवळ मैत्री आहे, अरबाझकडे सापडलेल्या गोष्टींशी त्याचा काहीही संबंध नाही


जी कलमं लावण्यात आलीत, त्या अंतर्गत जास्तीत जास्त एका वर्षाची शिक्षा


त्यामुळे आर्यन जामीनास पूर्णपणे पात्र, त्याचा या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नाही


 


अरबाझ मर्चंटचे वकील तारीक सईद यांचा युक्तिवाद -


अरबाझकडे ड्रग्ज सापडल्याचं मान्य मात्र ते अतिशय कमी प्रमाणात होतं


त्याचा कुठल्याही प्रकारे ड्रग्जच्या व्यवसायाशी संबंध नाही


एनसीबीची केस केवळ मोबाईलवरील संभाषणावर आधारीत, ज्यातनं काहीही स्पष्ट होतं नाही



मुनमुन धमेचाचे वकील अली काशिफ खान देशमुख यांचा युक्तिवाद -


मुनमुन पूर्णपणे निर्दोष, तिचा या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नाही


ती आर्यन किंवा अरबाझला ओळखतही नाही


तिच्याजवळ ड्रग्ज सापडल्याचा दावाच मुळात चुकीचा


तिच्या जवळ पडलेल्या सामानातून ड्रग्ज सापडलं, जे तिच नव्हतंच