मुंबई: समाज प्रबोधन आणि स्वच्छतेचा संदेश देणारा सिनेमा म्हणून यंदा अक्षय कुमारचा ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ चांगलाच गाजला. या सिनेमाचं कौतुक स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं.


आता तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्थात मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही ‘टॉयलेट एक प्रेम कथा’वर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

बिल गेट्स यांनी 2017 चं विश्लेषण करताना, अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा उल्लेख करत, या सिनेमाचं कौतुक केलं.

बिल गेट्स यांनी ट्वीट करुन, या वर्षभरात आपण कोणत्या गोष्टींमुळे प्रभावित झालो, याची माहिती दिली. यामध्ये त्यांनी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा उल्लेख करत, सिनेमाचं कौतुक केलं.

“2017 हे वर्ष खडतर होतं, यात शंका नाही. पण या वर्षानेही काही आशा आणि प्रगतीचे अद्भुत क्षण दिले. असेच काही प्रेरणादायी ट्वीट, जे तुम्ही पाहिले नसाल.....

‘टॉयलेट एक प्रेम कथा’ हा बॉलिवूडचा सिनेमा, नवविवाहित दाम्पत्याची प्रेमकहाणी आहे. या सिनेमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली आहे", असं बिल गेट्स यांनी ट्विट केलं आहे.




अक्षय कुमार पॅडमॅनमध्ये व्यस्त

दरम्यान, अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी पॅडमॅन या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमातून तो सॅनिटरी पॅडबाबत जागरुकता करताना दिसणार आहे.

येत्या 26 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आर बाल्की यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

अक्षयचे तीन सिनेमे

अक्षय कुमारने 2017 मध्ये तीन सिनेमे केले. वर्षाच्या सुरुवातीला ‘जॉली एलएलबी 2’ हा सिनेमा आला. या सिनेमाने 197 कोटींची कमाई केली.

त्यानंतर अक्षयने ‘नाम शबाना’ सिनेमात छोटीशी भूमिका साकारली. हा सिनेमा 2015 मध्ये आलेल्या ‘बेबी’चा प्रीक्वल होता.

मग यानंतर आलेल्या 'टॉयलेट एक प्रेम कथा'ने देशाचं लक्ष वेधून घेतलं. हा सिनेमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानावर आधारित होता.

या सिनेमातून भारतातील खेड्यांमधील शौचालयांची स्थिती आणि त्याबाबतची जनजागृती करण्यात आली. या सिनेमाने 216 कोटी रुपयांची कमाई केली.