Mhorkya : 'म्होरक्या' (Mhorkya) हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा 2020 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हा सिनेमा आता एका वेगळ्या कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचं कारण आहे गूगलवर या सिनेमाची दाखवण्यात आलेली कास्टिंग. या सिनेमाच्या कास्टिंगमध्ये चक्क क्रिकेटर अनिल कुंबळे असल्याचं गूगलवर दिसत आहे. या सिनेमात अनिल कांबळे (Anil Kamble) नामक कलाकाराने काम केलं आहे. पण गूगलवरील या सिनेमातील कलाकरांच्या यादीत अनिल कांबळे ऐवजी अनिल कुंबळे (Anil Kumble) दिसत आहे. गूगलच्या गुगलीनं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 


गूगलच्या (Google) या चुकीबाबत या सिनेमाचे दिग्दर्शक अमर देवकर (Amar Deokar) एबीपी माझा डिजिटलशी बोलताना म्हणाले की, "ही तांत्रिक चूक आहे. आम्ही यावर काम करत आहोत. सिनेमात अनिल कांबळे नावाचे कलाकार आहेत. त्यांच्या नावात काहीसं साधर्म्य असल्यानं हा प्रकार घडला असावा. यात लवकर बदल केला जाईल. सध्या अमेझॉन प्राईमवर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'म्होरक्या' सिनेमाला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे". 



बार्शी (Barshi) सारख्या ग्रामीण भागातील अमर देवकर यांनी दिग्दर्शित केलेला 'म्होरक्या' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमाने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले होते. 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘म्होरक्या’ या सिनेमाला विशेष उल्लेखनीय कामगिरी आणि उत्कृष्ट बालचित्रपट गटात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ग्रामीण भागातील वास्तव गोष्टीवर भाष्य करणाऱ्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या सिनेमात रमण देवकर, अमर देवकर, रामचंद्र धुमाळ, सुरेखा गव्हाणे, अनिल कांबळे, ऐश्वर्या कांबळे, यशराज कऱ्हाडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


‘या’ कारणाने सिनेमा आलेला चर्चेत!


गेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावेळी देशातील अनेक दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मंत्र्यांच्या हातून घेण्यास नकार दिला होता. राष्ट्रपतींऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुरस्कार देणार हे कळल्यानंतर अनेक लोकांनी हे पुरस्कार त्यावेळी नाकारले होते. त्या सर्वांना भारत सरकारने पोस्टाने पुरस्कार पाठवून दिले होते. 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या वेळी पुरस्कार न स्वीकारणाऱ्यांमध्ये अमर देवकर हे आघाडीवर होते. विशेष म्हणजे देवकर यांचा ‘म्होरक्या’ हा पहिलाच सिनेमा असून, त्यांच्या या सिनेमाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार न स्वीकारल्याने त्यांना हे पुरस्कार अखेर पोस्टाने घरपोच मिळाले होते. यावेळी त्यांनी पोस्टमन राहुल पवार यांचा भरपोशाख देऊन सन्मान केला होता.


संबंधित बातम्या


Mhorkya Movie Review | समाजभान आणणारा म्होरक्या