मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरला एका बांधकाम कंपनीची जाहिरात करणं महागात पडण्याची शक्यता आहे. 'एकता वर्ल्ड' या बांधकाम कंपनीसह अनिल कूपरला 'म्हाडा'ने कायदेशीर नोटीस बजावली आहे.


 

 

'एकता वर्ल्ड' या कंपनीने विरार आणि नाशिक इथे 'म्हाडा'पेक्षा कमी किंमतीत घरं, अशी जाहिरात केली आहे. मात्र या जाहिरातीत 'म्हाडा'चं नाव चुकीच्या पद्धतीने वापरलं आहे. 'एकता वर्ल्ड'ने स्वत:च्या फायद्यासाठी चुकीची आणि अनधिकृत माहिती दिल्याचा दावा 'म्हाडा'ने केला आहे.

 

 

"कोणतीही सत्यता न पडताळता अनिल कपूर ती जाहिरत कशी काय करु शकतो?", असा सवाल म्हाडाचे सचिव भारत बस्तेवाड यांनी केला आहे. "तसंच खासगी बांधकाम कंपनीची जाहिरात करण्यापूर्वी अनिल कपूरने किमान 'म्हाडा'कडून सत्यतेची खात्री करायला हवी होती," असं म्हटलं आहे.

 

 

'एकता वर्ल्ड'च्या जाहिरातीमुळे 'म्हाडा'ची प्रतिमा मलिन झाली आहे. तसंच जाहिरात देताना कंपनीने 'एएससीआय'च्या नियमावलीचा भंग केल्याचं म्हाडाच्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

 

 

'एकता वर्ल्ड'च्या वेबसाईटवर घरांच्या दरांची तुलना करणारी जाहिरात अपलोड केली आहे. त्यामुळे म्हाडाने अनिल कपूरसह एकता वर्ल्डचे मालक अशोक मोहनानी यांनाही नोटीस धाडली आहे.

 

'एकता वर्ल्ड'ची जाहिरात