Eknath Shinde Shivsena Joined Marathi Celebrities : महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवारांनी (Ajit Pawar) शिंदे आणि फडणवीस गटाशी हातमिळवणी केली असून आता ते महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिव चित्रपट सेनेच्या लोगोचं अनावरण केलं असून आता मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त ठाण्यातील आनंदाश्रमात एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिव चित्रपटसेनेच्या लोगोचं अनावरण केलं आहे. दरम्यान मराठी मनोरंजनसृष्टीतील हार्दिक जोशी (Hardeek Joshi), आदिती सारंगधर (Aditi Sarangdhar), माधव देवचके (Maadhav Deochake), अमोल नाईक, प्रतीक पाटील या कलाकारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मराठी सेलिब्रिटींचे शिंदे गटात प्रवेश करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिंदे गटात प्रवेश करण्याबद्दल हार्दिक जोशी म्हणाला,"आजवर प्रेक्षकांसाठी काम केलं आहे. आता पडद्यामागून काम करणाऱ्या कलाकारांसाठी काम करायची इच्छा आहे. आता राजकारणात प्रवेश केल्याने ते काम करण्याची संधी मिळणार आहे".
आदिती सारंगधर म्हणाली,"शिदे साहेब हे एकच नेते असे आहेत जे कधीही सर्वसामान्यांपर्यंत पोचू शकणारे आहेत. त्यामुळे आता शिंदे गटात प्रवेश केला आहे". गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली आहे. चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलारची (Sushant Shelar) निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुशांतची निवड केली. तर उपाध्यपदी राजेश भोसले, शेखर फडके, केतन क्षिरसागर, भरत भानूशाली, शंतनु कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस' फेम मेघा धाडेनेदेखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी प्रिया बेर्डेंनी राष्ट्रवादीला राम-राम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्वीट करत राजकीय वाटचालीसाठी कलाकारांना दिल्या शुभेच्छा
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत कलाकारांना राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिलं आहे,"मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता हार्दिक जोशी, आदिती सारंगधर, माधव देवचाके, अमोल नाईक, प्रतीक पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या".
एकनाथ शिंदेंनी पुढे लिहिलं आहे,"शिवसेना कायमच मराठी कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभी असून चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि काम करणारे तंत्रज्ञ यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठीच शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली असून चित्रपट सृष्टीतील कामगार, तंत्रज्ञ यांचेही प्रश्न सुटावेट अशी अपेक्षा यावेळी बोलताना व्यक्त केली".
संबंधित बातम्या