Movie: आज अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. संपूर्ण देशात राममय वातावरण आहे. अनेक चित्रपटात तसेच मालिकांमध्ये देखील रामायण दाखवण्यात आलं आहे. आता रामायणावर आधारित असणाऱ्या 107 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या एका चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात, ज्यामध्ये राम आणि सीता मातेची भूमिका एकाच मराठमोळ्या व्यक्तीनं साकारली होती.
107 वर्षापूर्वी रिलीज झाला चित्रपट
'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय मूकपट 1912 साली रिलीज झाला होता. भारताच्या चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटानंतर दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये 'मोहिनी भस्मासुर' या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटानंतर त्यांनी 1917 मध्ये 'लंका दहन' नावाच्या चित्रपटाची केली. या चित्रपटाने 107 वर्षांपूर्वी चांगली कमाई केली होती.
मराठमोळ्या कलाकारानं साकारली राम आणि सीता मातेची भूमिका
107 वर्षांपूर्वी स्त्रिया चित्रपटात काम करत नव्हत्या. त्यामुळे दादासाहेब फाळके यांना त्यांच्या चित्रपटातील स्त्री भूमिका साकारण्यासाठी कलाकार शोधताना अनेक अडथळे आले. त्यामुळेच 'लंका दहन' या चित्रपटात प्रभू श्री रामाची भूमिका आणि माता सीतेची भूमिका एकाच कलाकारानं साकारली होती. त्या कलाकाराचं नाव अण्णा साळुंके असे होते.
जाणून घ्या अण्णा साळुंके यांच्याबद्दल
अण्णा साळुंके हे मुंबईतील एका हॉटेलमध्ये कुक किंवा वेटर म्हणून काम करत होते, असं म्हटलं जातं. त्यानंतर दादासाहेब फाळके यांनी अण्णांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली. राजा हरिश्चंद्र या चित्रपटात देखील अण्णा साळुंके यांनी काम केलं होतं.या चित्रपटात त्यांनी राणी तारामतीची भूमिका साकारली होती.
चित्रपटाची कमाई बैलगाडीतून पोती नेईपर्यंत झाली!
इतिहासकार अमृत गांगर यांनी सांगितले की, 'लंका दहन' या चित्रपटाने इतकी कमाई केली की तिकीट काउंटरवरील नाणी पोत्यांमध्ये गोळा करून ती पोती बैलगाडीमध्ये भरून निर्मात्याच्या कार्यालयात नेण्यात आली होती. चित्रपट पाहण्यासाठी लोक तिकीट काउंटवर लांबच लांब रांगा लावत होते. त्यावेळी प्रेक्षक हा चित्रपट शूज आणि चप्पल काढून आणि हात जोडून बघत होते.
'लंका दहन' या चित्रपटाची कथा रामाच्या 14 वर्षांच्या वनवासापासून सुरू होते आणि रावणाच्या वधाने संपते. या चित्रपटात काही खास प्रकारचे स्पेशल इफेक्ट्सही वापरण्यात आले. हा चित्रपट 6 मिनिटांचा होता.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: