Kiran Mane on Sushma Andhare : मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे किरण माने (Kiran Mane) यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव ठाकरे गटात (Shiv Sena Uddhav Thackeray) प्रवेश केला आहे. किरण माने यांना 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतून काढलं त्यावेळी सुषमा अंधारे (Sushma Andhare) त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. सुषमा अंधारे या किरण माने यांना बहिणीसारख्या आहेत. 


सुषमा अंधारे यांच्याबद्दल एबीपी माझासोबत बोलताना किरण माने म्हणाले,"सुषमा अंधारे या मला सख्ख्या बहिणीसारख्या आहेत. मला मालिकेतून काढून टाकलं त्यावेळी माझी आणि त्यांची ओळख नव्हती तरीदेखील त्या मला न्याय मिळावा म्हणून माझ्यासोबत सगळीकडे फिरत होत्या. प्रचंड प्रयत्न करत होत्या". 


सुषमाताई म्हणजे मायेची सावली : किरण माने


किरण माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर खास फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्येदेखील त्यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल भाष्य केलं आहे. किरण माने यांनी लिहिलं आहे,"मला बहिणीसारख्या असलेल्या सुषमा अंधारेताईंनी 'मातोश्री'वर बोलावले तेव्हापासून काळीज धडधडायला लागलं होतं. सुषमाताई म्हणजे मायेची सावली. दोन वर्षांपूर्वी माझ्यावर जो मोठा आघात झाला होता, तेव्हा ओळख नसतानाही स्वत:हून फोन करुन भेटून, मला न्याय मिळावा म्हणून माझ्यासाठी जीवाचं रान केलेले जे दोनचार लोक होते, त्यांपैकी एक सुषमाताई. त्या सोबत असल्यामुळे एक दिलासा होता". 



किरण मानेंसाठी सुषमा अंधारेंची खास पोस्ट (Sushama Andhare on Kiran Mane)


सुषमा अंधारे यांनी किरण माने यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"कलाकार भूमिका घ्यायला कचरतात.  भूमिका वठवणे वेगळे आणि भूमिका घेणे वेगळे. किरण माने हा कलाकार भूमिका वठवत नाही तर  ठामपणे भूमिका घेतो. व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत ठामपणे उभी राहण्याची त्यांनी घेतलेली भूमिका ही स्वागतर्ह आणि तितकीच धाडसाची आहे. किरण भैया मनःपूर्वक अभिनंदन आणि परिवारात स्वागत.  बहीण म्हणून कायमच तुमच्या सोबत होते. आहे आणि राहील". 



किरण माने कोण आहेत? (Who is Kiran Mane)


किरण माने हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. 'सातारचा बच्चन' म्हणून ते ओळखले जातात. 'सिंधुताई माझी माई', 'मुलगी झाली हो' आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या किरण मानेंवर अनेकदा मोठ्या प्रमाणात टीका होत असते. अनेक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीदेखील गाजवली आहे. किरण माने यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) या कार्यक्रमामुळे किरण माने घराघरांत पोहोचले आहेत. 'मुलगी झाली हो' या मालिकेतून त्यांना राजकीय पोस्ट केल्याने बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.


संबंधित बातम्या


Kiran Mane Exclusive : सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेचा पर्याय असताना ठाकरेंची शिवसेना का निवडली? रोखठोक किरण मानेंची बेधडक उत्तरे