Kedar Shinde Post On Shahir Sable Birth Anniversary : शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चांगलाच गाजला. आज शाहीर साबळे यांच्या जयंतीनिमित्त (Shahir Sable Birth Anniversary) त्यांचा नातू केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. 


केदार शिंदे यांनी लिहिलं आहे,"बाबा... शाहीर साबळे... 3 सप्टेंबर हा तुमचा जन्मदिवस.. आज जन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल. मी 2019 मध्ये जे ठरवलं ते स्वामी कृपेने पुर्ण झालं. तुमच्या आयुष्याचं डॉक्युमेंटेशन झालं. आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा उपलब्ध आहे. पुढच्या कित्येक पिढ्या तुम्हाला विसरणार नाहीच याची खबरदारी घेतली आहे". 


केदार शिंदे यांनी पुढे लिहिलं आहे,"शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही, याचं शल्य आयुष्यभर मनात राहील. पण कोणावर का अवलंबून राहायचं? याची शिकवण याच काळात मिळाली. मी पुढे दिग्दर्शक म्हणून कसा आहे? हे सांगणं मला अवघड असलं तरी मी शाहीरांचा नातू म्हणून कसा आहे? याविषयी लोक भरभरुन बोलतील याची खात्री आहे...माझ्या आजोबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? यासाठी एक सिनेमा पाहिला तरी समजून येईल...माझी नातवंड जेव्हा विचार करतील की, आपल्या आजोबांनी काय केलं? त्यांच्यासाठी बस्स एक तुमचा सिनेमा पाहिला तरी खूप झालं". 






केदार शिंदे यांच्या पोस्टवर आमच्या पिढीतील लोकांना शाहीर साबळे यांच्याबद्दल फार माहिती नव्हती..पण हा सिनेमा पाहून त्यांच्या अफाट कर्तृत्वाची जाणीव झाली, विनम्र अभिवादन, शाहिरांसारखे आजोबा मिळाले हे तुमचं जितकं भाग्य तितकंच शहरांनाही अभिमान होत असेल तुमच्यासारखा नातू लाभला, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील गाण्यांवर फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांनी प्रेम केलं. शाहीर साबळे यांचा जन्म 3 सप्टेंबर 1923 रोजी झाला. आता त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाहिरांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या आयुष्यावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर'  सिनेमाची निर्मिती केदार शिंदे यांनी केली. 


'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमातील 'जय जय महाराष्ट्र माझा' या महाराष्ट्र गीतासह ‘या गो दांड्यावरून…’, ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या या…’ अशी लोकगीतंदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. केदार शिंदे यांनी खास पोस्ट शेअर करत शाहीर साबळेंसोबतचा फोटोही शेअर केला आहे.


संबंधित बातम्या


Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...