मुंबई : दिग्दर्शक आणि सिनेनिर्माता करण जोहरने रक्षाबंधनाच्या निमित्ताने पहिल्यांदा त्याच्या जुळ्या मुलांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करण जोहरची आई हिरु यश आणि रुही या मुलांसोबत दिसत आहे.
यावर्षी सरोगसीच्या माध्यमातून या दोन मुलांचा जन्म झाला आहे. ज्यामध्ये एका मुलीचा समावेश आहे, तर एक मुलगा आहे.
https://twitter.com/karanjohar/status/894497731904851968
करण जोहरने मुलांचं नाव यश आणि रुही का ठेवलं, यामागेही खास कारण आहे. करणने आपल्या मुलीचं ‘रुही’, तर मुलाचं ‘यश’ असं नामकरण केलं. करणचे वडील आणि दिवंगत निर्माते यश जोहर यांच्या नावावरुन यश, तर आई हिरु जोहर यांच्या नावातील अक्षरांवरुन रुही हे नाव ठेवण्यात आलं आहे.
मुंबईच्या अंधेरी भागातील मसरानी रुग्णालयात 7 फेब्रुवारीला या दोन बाळांचा जन्म झाल्याची माहिती आहे. मात्र अनेक दिवस जोहर कुटुंबाने ही गोष्ट उघड केली नाही. वडील म्हणून करणच्या नावाची नोंदणी करण्यात आली असून आईच्या नावाचा उल्लेख नाही.
करण जोहरने यापूर्वी अनेक वेळा पिता होण्याची इच्छा जाहीर केली होती. त्यामुळे करण लग्न करणार असल्याची अटकळ बॉलिवूडसह तमाम चाहत्यांनी बांधली होती. मात्र सरोगसीच्या माध्यमातून सिंगल फादर होत करणने या सर्व चर्चांना छेद दिला आहे. भारतात 2002 पासून सरोगसी कायदेशीर आहे, मात्र आई किंवा वडील यांपैकी एक जण दाता असणं बंधनकारक आहे.