बंगळुरु : पाकिस्तानसंदर्भात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांच्या वक्तव्याचा विरोध करणं कन्नड अभिनेत्री रम्याला चांगलंच महागात पडलं आहे. पाकिस्तान म्हणजे नरक नसल्याचं म्हटल्याने रम्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात येत आहे.

 
पाकिस्तानला जाणं म्हणजे नरकात जाण्यासारखं आहे, असं वक्तव्य मनोहर पर्रिकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याचा संदर्भ घेत 33 वर्षीय रम्या उर्फ दिव्या स्पंदनाने 'पाकिस्तान हा काही नरक नाही. पाकिस्तानी नागरिक आपल्यासारखेच आहेत. त्यांनी आम्हाला चांगली वागणूक दिली' असं रम्याने म्हटलं.

 
काँग्रेसची माजी खासदार राहिलेल्या रम्याच्या या वक्तव्याचा राजकीय वर्तुळातून चांगलाच समाचार घेण्यात आला. तिचं वक्तव्य देशविरोधी असल्याची टीका राजकीय नेत्यांनी केली आहे. त्यानंतर दक्षिण कर्नाटकातील कोडगुमधल्या कोर्टात एका वकिलाने देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे.

 
सार्क परिषदेला उपस्थित राहिलेल्या युवा खासदारांमध्ये रम्याचा समावेश होता. इस्लामाबाद दौऱ्यात आपल्याला वाईट अनुभव आला नसल्याचं सांगताना तिने पाकिस्तानवर स्तुतिसुमनं उधळल्याचा दावा खटला दाखल करणारे वकील कत्नामने विठ्ठल गौडा यांनी केला आहे.