Kalsutra : मराठी मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज असणाऱ्या जिओ स्टुडिओजने गेल्या काही दिवसात अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची घोषणा केली. आता जिओ स्टुडिओने एका नव्या वेब-शोची घोषणा केली आहे. सलील देसाई यांच्या ‘मर्डर माईलस्टोन’ कादंबरीवर आधारीत ‘कालसूत्र’ (Kalsutra) हा रोमांचकारी थरारक वेब-शो लवकरच आपल्या भेटीला येणारं आहे.


एक कर्तबगार पोलीस अधिकारी, फाशीच्या शिक्षेवर असणारा एक सिरियल किलर, त्याच्या क्रूरतेचा बळी पडलेली आठ लोकं, आणि त्याचा अदृश्य असलेला शिष्य, अशा गुंतागंतीची चौकट असणारी ही कथा आहे. कथानकातील वेगळेपण, रहस्यमयता आणि थरार यामुळे ‘कालसूत्र’चा हा पहिला सीजन प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास निर्माते व्यक्त करतात. 


मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार सुबोध भावे, सयाजी शिंदे, अनंत जोग, उर्मिला कानेटकर-कोठारे, भाऊ कदम, पुष्कराज चिरपुटकर, शुभंकर तावडे, उमेश जगताप आणि अश्विनी कासार अशी कलाकारांची तगडी स्टारकास्ट ‘कालसूत्र’मध्ये झळकणार आहेत. भीमराव मुडे यांनी या वेब-शोच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून, जिओ स्टुडिओजसह मंजिरी सुबोध भावे यांच्या नेतृत्वाखालील कान्हा निर्मिती संस्थेने या वेब-शोची निर्मिती केली आहे.


पाहा टीझर:






या वेब-शोबद्दल सुबोध भावे सांगतात, ‘‘एखाद्या बेस्टसेलर पुस्तकावर आधारित काम करणे ही माझ्यासाठी नवीन गोष्ट होती. आणि म्हणूनच ‘कालसूत्र’ या शोमध्ये मुख्य पोलीस अधिकारी म्हणून काम करणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. ही मालिका प्रेक्षकांना त्याच्या कथानकाने नक्कीच भुरळ घालेल याची मला खात्री आहे. महत्वाचं म्हणजे मोठ्या स्केलवर, चित्रपटाच्या धर्तीवर याची आम्ही निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे.”


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: