“नाग्या, तुझी कला जखमेतून येतेय. ती जखम भळभळत राहो.”
एबीपी माझा वेब टीम | 10 May 2016 06:58 AM (IST)
मुंबई : “कला दुःखातून जन्माला येते, असं ऐकलंय नाग्या तुझी कला जखमेतून येतेय. ती जखम भळभळत राहो आणि ती आमची होवो.”, ही वाक्य आहे मराठीतील संवेदनशील अभिनेता जितेंद्र जोशी याचं. सध्या महाराष्ट्रासह देशभर ज्या ‘सैराट’ सिनेमाचा बोलबाला आहे, त्या सिनेमावर जितेंद्रने आपल्या फेसबुकवर एक छोटेखानी पोस्ट लिहिली आहे. नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाने महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावलं आहे. महाराष्ट्राबाहेरही ‘सैराट’ला भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. आमीर खान, अनुराग कश्यप, अयुष्यमान खुराना, रितेश देशमुख, श्रेया घोषाल यांच्यासह अनेक कलाकारांनी ‘सैराट’चं तोंडभरुन कौतुक केलं आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने आपल्या फेसबुक पेजवरुन ‘सैराट’ चित्रपट आणि नागराजच्या दिग्दर्शनावर छोटेखानी पोस्ट लिहिली आहे. आपल्या हटके विषयांच्या चित्रपटांमुळे ओळखला जाणारा आणि संवेदनशील दिग्दर्शक अशी ख्याती असलेल्या ‘सैराट’चा दिग्दर्शक नागराजचंही तोंडभरुन कौतुक केलं आहे. “सिनेमा या तंत्रावर नागराज ची स्वतः ची हुकूमत /सौन्दर्यदृष्टि किती परिणामकारक आहे हे पुन्हा अधोरेखित झालं सर्व कलाकारांचा अभिनय हा अभिनय न वाटता पात्रं खरी वाटतात. रिंकु राजगुरु ने तर डोळ्यांचं पारणं फिटवलं. परंतु या सर्वांच्या पलीकडे नागराज मंजुळे नावाचा लेखक आणि त्याने पाहिलेलं/जगलेलं आयुष्य या सर्वांपेक्षा वर तरंगत राहतं.”, असे म्हणत जितेंद्रने ‘सैराट’चं आणि नागरजाच्या दिग्दर्शन कौशल्याची स्तुती केली आहे.