Jhimma : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'झिम्मा' (Jhimma) सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे. 27 जूनला या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. 27 जूनला दुपारी एक वाजता प्रवाह पिक्चरवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. 


सिनेमाचे कथानक काय?


'झिम्मा' हा मराठीतील पहिला बिग बजेट सिनेमा आहे. सिनेमागृहात या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. वेगवेगळी पार्श्वभूमी, निराळ्या आवडीनिवडी आणि विविध वयोगटातील अनोळखी स्त्रिया सहलीच्या निमित्ताने एकत्र येतात. त्यादरम्यान त्यांच्यात होणारी धमाल,मजा म्हणजे 'झिम्मा' हा सिनेमा आहे. या सिनेमातील स्त्रिया सिनेमात मजा-मस्ती, एकमेकींची काळजी आणि मानसिक धैर्य देताना दिसून येत आहेत. 


'झिम्मा' - कौटुंबिक सिनेमा


आपण आयुष्यातली मजा आपल्या नकळत कशी हरवून बसतो ते 'झिम्मा' या सिनेमात अधोरेखित करण्यात आले आहे. 'चूल आणि मूल' या संकल्पनेखाली वावरणाऱ्या स्त्रिया जेव्हा मोकळ्या आकाशाखाली स्वछंदी आयुष्य जगतात, तेव्हा त्यांची स्वतःशीच एक नवीन ओळख होते. त्यामुळे प्रत्येक महिलेने पाहावा, असा हा सिनेमा आहे. हा सिनेमा म्हणजे एक कौटुंबिक सिनेमा आहे.


तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा


'झिम्मा' सिनेमात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, छोटी सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाची खासियत म्हणजे विविध वयोगटातील अभिनेत्रींनी नटलेला हा सिनेमा आहे. या सर्व अभिनेत्रींसोबत सिनेमाची शान वाढवायला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकरदेखील दिसणार आहे. 'झिम्मा' सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केलं आहे. तर इरावती कर्णिक यांनी लेखन केलं आहे. मनोरंजनाची मेजवानी असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे. 


संबंधित बातम्या


Major : बॉक्स ऑफिसवर 'मेजर'चा धमाका; विकेंडला केली दुप्पट कमाई


Chakda Xpress : अनुष्का शर्माच्या 'चकदा एक्सप्रेस' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; झुलन गोस्वामींची भूमिका साकारणार