Junior Mehmood: अभिनेता नईम सय्यद ऊर्फ ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) हे कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता जॉनी लीव्हरने ज्युनियर मेहमूद यांची भेट घेतली आणि त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. आता अभिनेते जितेंद्र आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांनी देखील ज्युनियर मेहमूद यांची भेट घेतली आहे. ज्युनियर मेहमूद यांना पाहून जितेंद्र हे भावूक झाले.
ज्युनियर महमूद यांनी आपले जुने मित्र, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांच्याशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर जितेंद्र आणि सचिन पिळगावकर हे ज्युनियर महमूद यांना भेटायला गेले. ज्युनियर मेहमूद यांच्या तब्येतीची विचारपूस करताना जितेंद्र हे भावूक झाले. तसेच सचिन पिळगावकर यांनी ज्युनियर मेहमूद यांच्यासोबत व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. त्यानंतर ते ज्युनियर मेहमूद यांना भेटण्यासाठी देखील गेले होते.
सचिन पिळगावकर यांनी शेअर केली पोस्ट
सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी चाहत्यांना ज्युनियर मेहमूद हे लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करायला सांगितली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "मी तुम्हा सर्वांना माझा बालपणीचा मित्र ज्युनियर मेहमूदसाठी प्रार्थना करण्याची विनंती करतो जो एका आजाराने त्रस्त आहे. मी काही दिवसांपूर्वी त्याच्याशी व्हिडीओ कॉलवर संभाषण केले होते आणि आज त्याला भेटायला गेलो होतो पण तो तो झोपला होता. मी त्याचा मुलगा आणि जॉनी लीव्हर यांच्यासोबत संपर्कात आहे."
काही दिवसांपूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सलाम काझी सांगितलं, "ज्युनियर मेहमूद हे दोन महिन्यांपासून आजारी होते. सुरुवातीला आम्हाला वाटले की, त्यांना आरोग्याच्या संबंधित किरकोळ समस्या असतील पण त्यानंतर अचानक त्यांचे वजन कमी होऊ लागले आणि जेव्हा वैद्यकीय अहवाल आला तेव्हा त्यात त्यांना कर्करोग असल्याचे सांगण्यात आले."
ज्युनियर महमूद यांनी कारवां या चित्रपटात जितेंद्र यांच्यासोबत काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी जितेंद्र यांच्या लहान भावाची भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी विविध भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये ब्रह्मचारी (1968), मेरा नाम जोकर (1970), परवरिश (1977), आणि दो और दो पांच (1980) यांसारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या: