मुंबई: टीव्ही अभिनेता असलेला जय भानुशाली आणि माही विज यांच्या घरी काम करणाऱ्या आचाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे. या दोघांना आणि त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीला, ताराला या आचाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर या दोघांनी त्या आचाऱ्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. संतोष यादव असं त्या आचाऱ्याचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 


माही विज हिच्या घरी संतोष यादव हा आचाऱ्याचं काम करत होता. या दोघांमध्ये पगारावरुन वाद झाल्यानंतर संतोष यादवने तिला आणि तिचा पती जय तसेच दोन वर्षाची मुलगी तारा हिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. माही विजने या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली. 


काय आहे घटना? 
"माही विज हिने सांगितलं की, त्यांच्या घरात काही काळ एक व्यक्ती स्वयंपाकी म्हणून काम करत होता. मात्र, या दरम्यान तो चोरी करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्याला विचारणा केली असता, तो महिन्याभराचा पगार मागू लागला. त्यावरून ही बाचाबाची इतकी वाढले की, त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. मी जयला ही गोष्ट सांगितली आणि तो आल्यावर त्याने कुकला पैसे देऊन कामावरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पूर्ण महिन्याचा पगार मागायला सुरुवात केली. यावर जयने सवाल केला असता, मी 200 बिहारी आणून त्यांना उभे करीन, अशी धमकी त्याने दिली. तो आम्हाला शिवीगाळ करू लागला. आम्ही पोलिसांकडे गेलो आणि याची रीतसर तक्रारही नोंदवली."


माहीला वाटतेय कुटुंबाची काळजी
अभिनेत्रीने असेही म्हटले की, तिला काही झाले तरी त्याची तिला पर्वा नाही. परंतु, ती तिला तिच्या मुलीची चिंता वाटते. माही पुढे म्हणाली की, ‘जेव्हा आम्ही पोलिस स्टेशनला गेलो, तेव्हा तो मला सतत फोन करत होता. माझ्याकडे सर्व रेकॉर्डिंग आहेत. त्याने खरंच मला जीवे मारले तर? मला काही झाले तर, लोक नंतर त्याचा निषेध करतील. त्याने काय होईल? मला माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची भीती वाटते. तो सध्या जामिनावर बाहेर आल्याचे मी ऐकले आहे. त्याने ज्या प्रकारे धमकावले आहे, ते प्रत्यक्षात केले तर? सध्या माहीला तिच्या कुटुंबाची काळजी वाटत आहे.