मुंबई : अक्षय कुमारने आपल्या कॅनडियन नागरिकत्वाबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर तो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी पात्र आहे की नाही, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अक्षयकडून राष्ट्रीय पुरस्कार परत घ्यावा का, असा सवाल काही नेटिझन्स विचारत आहेत.


2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रुस्तम' चित्रपटासाठी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अक्षयला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र हा पुरस्कार काढून घेण्याची मागणी काही जणांनी केली आहे.

दरम्यान, परदेशी तंत्रज्ञ आणि कलाकारही भारतातील राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यास पात्र आहेत, अशी माहिती दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी ट्विटरवरुन दिली आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या नियमावलीचा फोटो ट्वीट करत ढोलकियांनी अक्षयची पाठराखण केली आहे.


लेखक अपूर्व असरानी यांनी ट्विटरवरुन अक्षय पुरस्कारास पात्र नसल्यास काय पावलं उचलणार? असा सवाल विचारला होता. त्यावर्षी 'अलिगढ' चित्रपटात मुख्य भूमिका करणारा मनोज वाजपेयी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी प्रबळ दावेदार होता, याकडे असरानींनी लक्ष वेधलं.




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अराजकीय मुलाखत घेतल्यानंतर अक्षय कुमार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. अक्षय कुमारने लोकसभा निवडणुकीसाठी मतदान न केल्यामुळे अनेक जणांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती.



अक्षयने ट्विटरवरुन आपल्या नागरिकत्वाबाबत स्पष्टीकरण दिलं. 'माझ्या नागरिकत्वाविषयी अकारण होणाऱ्या चर्चेचं कारण मला समजतच नाही. माझ्याकडे कॅनडियन पासपोर्ट असल्याचं मी कधी नाकारलं नाही, लपवलंही नाही. मी गेल्या सात वर्षांत कॅनडाला गेलोही नाही' असंही अक्षय म्हणाला.


'मी भारतात काम करतो. भारतात सर्व कर भरतो. इतक्या वर्षांत मला भारताविषयीचं प्रेम सिद्ध करण्याची आवश्यकताच नव्हती. माझ्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन वारंवार वाद निर्माण करणं क्लेशदायी आहे. हा वैयक्तिक, कायदेशीर, अराजकीय मुद्दा असून त्याचा कोणावरही परिणाम होत नाही' असंही अक्षय पुढे म्हणाला होता.