Ashish Vidyarthi Birthday : अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते आशीष विद्यार्थी (Ashish Vidyarthi ) आज (19 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. आशीष यांचा जन्म 19 जून 1962 रोजी केरळमधील कन्नूर येथे झाला. आशीष यांना त्यांच्या घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यामुळे मोठं होऊन आपण अभिनेता बनायचं हे त्यांनी बालपणीच मनाशी पक्कं केलं होतं. आपल्या याच प्रवासाच्या दिशेने पुढे सरकण्यासाठी त्यांनी 1990मध्ये दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (NSD) प्रवेश घेतला आणि आपले अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले.
अभिनायचे शिक्षण घेत असताना आणि पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी दिल्लीत राहून अनेक नाटके केली. त्यानंतर ते नव्या संधीच्या शोधात 1992 दरम्यान मुंबईत आले. बॉलिवूड इंडस्ट्रीत त्यांनी आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केली. इथून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुन्हा कधीच थांबला नाही.
‘विठ्ठल काणीया’ला मिळाले विशेष प्रेम!
‘नाजायज’, ‘जीत’, ‘भाई’, ‘रेस’, ‘जिद्दी’, ‘मेजर साब’, ‘सोल्जर’, ‘हसीना मान जायेगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. पण, त्यांचे असे काही चित्रपट आले, ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्यापैकीच एक म्हणजे 'वास्तव' हा चित्रपट! ‘वास्तव’ या चित्रपटात त्यांनी 'विठ्ठल काणीया' ही भूमिका साकारली होती, जी तुफान लोकप्रिय झाली.
तब्बल 150हून अधिक चित्रपटात साकारला खलनायक!
अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आशीष विद्यार्थी नकारात्मक भूमिकेत दिसले आहेत. एक-दोन वेळा नव्हे तर, त्यांना आतापर्यंत तब्बल 150हून वेळा चित्रपटांमध्ये जीव गमवावा लागला आहे. अर्थात खलनायक म्हणून त्यांना यमसदनी जावे लागले आहे. मात्र, एका चित्रपटाच्या अशाच एका सीन दरम्यान त्यांचा जीव खरोखरच धोक्यात आला होता. ‘बॉलिवूड डायरी’ चित्रपटाचा सीन चालू होता. त्यात ते बुडत होते. ते खरोखरच बुडत होते, पण तिथल्या लोकांना वाटले की, ते केवळ अभिनय करत आहेत. त्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याने मोठ्या कष्टाने त्यांचे प्राण वाचवले.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या