विजय मल्ल्यावर आधारित चित्रपटात गोविंदा मुख्य भूमिकेत!
एबीपी माझा वेब टीम | 30 May 2018 03:23 PM (IST)
पहलाज निहलानी यांनी विजय मल्ल्यावर आधारित 'रंगीला राजा' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली असून गोविंदा यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मुंबई : भारतीय बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशात पसार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट येत आहे. पहलाज निहलानी यांनी 'रंगीला राजा' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली असून गोविंदा यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'रंगीला राजा' या चित्रपटात मल्ल्याने केलेल्या आंतरराष्ट्रीय घोटाळ्यांवर प्रकाशझोत टाकला जाण्याची शक्यता आहे. चित्रपट पूर्णपणे मनोरंजक असेल, अशी ग्वाही निहलानी यांनी दिली आहे. पहलाज निहलानी हे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत. रंगीला राजाच्या निमित्ताने गोविंदाला पुनरागमनाची नामी संधी मिळू शकते. ऑगस्टमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चिन्नी प्रकाश यांनी कोरिओग्राफ केलेल्या एका गाण्याचं शूटिंग गेल्या आठवड्यात करण्यात आलं. किंगफिशर कॅलेंडरच्या थीमवर हे गाणं आधारित आहे. 'रंगीला राजा'च्या निमित्ताने गोविंदा आणि निहलानी अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येणार आहेत. गोविंदाचं पदार्पण असलेला इल्जाम, शोला और शबनम, आँखे असे अनेक हिट चित्रपट या जोडीने दिले आहेत.