Sunita Ahuja On Govinda: बॉलीवूडचा ‘हीरो नंबर 1’ म्हणून ओळखला जाणारा गोविंदा (Govinda) पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याची पत्नी सुनीता आहूजा (Sunita Ahuja) यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या नात्यातील दरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सुनीता यांनी आपल्या वैवाहिक जीवनातील अनुभव उघडपणे मांडले आहेत. (Bollywood News)
गोविंदाच्या चुका आणि नात्याबद्दल काय म्हणाल्या सुनीता?
पिंकव्हिलाशी खास बातचीत करताना गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल आणि गोविंदासोबतच्या नात्यावर मोकळेपणाने चर्चा केली. गोविंदाच्या चुका सांगताना त्या म्हणाल्या, “प्रत्येकाने स्वतःला सांभाळून ठेवायला हवं. तरुणपणी चुका होतात, मीही केल्या आहेत आणि गोविंदानेही केल्या आहेत. पण जेव्हा वयाची एक मर्यादा येते, आणि त्यानंतरही माणूस चुका करत राहतो, तेव्हा ते शोभत नाही. आणि का करायच्या चुका? सुंदर कुटुंब आहे, पत्नी आहे, सुंदर मुलं आहेत, मग का?”
'घरापेक्षा जास्त वेळ हिरोईन्स आणि सेट्सवर...'
या वक्तव्यानंतर सुनीता यांनी गोविंदावर अप्रत्यक्ष टोला लगावला. त्यांनी म्हटलं, सुनीता पुढे म्हणाल्या, “ आमचं विचारविश्व पूर्ण वेगळं आहे. त्यांची विचारसरणी वेगळी, माझी वेगळी. आज मी जिवंत आहे, कारण मला माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे. मला वाटतं माझी मुलं फक्त माझ्यावरच प्रेम करावीत. बघा, तो हिरो आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलणार? पण पत्नीपेक्षा जास्त वेळ तो हिरोईन्ससोबतच घालवतो. एका स्टारची पत्नी असणं सोपं नसतं. मन खूप मजबूत बनवावं लागतं, कधी कधी ते दगडासारखं करावं लागतं. मला हे सगळं समजायला तब्बल 38 वर्ष लागली. तरुणपणी हे काही जाणवलंच नव्हतं.”
सुनीता यांच्या या विधानानंतर गोविंदा आणि त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी पुढे एक धक्कादायक विधान करताना सांगितले, “गोविंदा एक चांगला मुलगा आहे, चांगला भाऊ आहे, पण नवऱ्याच्या भूमिकेत नाही. पुढच्या जन्मी तो माझा नवरा म्हणून नाही, तर मुलगा म्हणून यावा, अशी माझी इच्छा आहे. सात जन्मांची गोष्ट सोडा, हा एकच जन्म पुरेसा आहे.” असं म्हणत त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल नाराजीचा सूर लावल्याचं दिसलं.
गोविंदा आणि सुनिताचं नात्याविषयी पुन्हा चर्चा
यापूर्वीही सुनीता आहूजाने एका मुलाखतीत गोविंदावर ‘दक्षिणेतील अभिनेत्रीबरोबर अफेअर’ असल्याचा इशारा दिला होता. आता त्यांच्या या नव्या वक्तव्यानंतर घटस्फोटाच्या अफवा पुन्हा जोमात आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये गोविंदा आणि सुनीता यांचं नातं आता शेवटच्या टप्प्यावर आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. गोविंदा आणि सुनीता यांनी 1987 साली लग्न केलं होतं. दोघांना दोन मुले आहेत. टीना आणि यशवर्धन. अनेक वर्षं या जोडप्याला ‘परफेक्ट कपल’ म्हणून ओळखलं जात होतं. पण मागील काही वर्षांत त्यांच्यातील तणाव आणि एकमेकांविषयीचे वक्तव्य यामुळे त्यांच्या नात्याभोवती वादाचे ढग पुन्हा जमा झाले आहेत.