सोनाली बेंद्रेच्या प्रकृतीविषयी गोल्डी बहलची ट्वीट
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2018 01:29 PM (IST)
गेल्याच महिन्यात सोनालीला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचे समोर आल आहे. स्वत: सोनाली बेंद्रेने त्याबाबतची माहिती ट्विटरवर दिली होती.
मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती तिचा पती गोल्डी बहलने ट्विटरद्वारे दिली आहे. तसेच सोनालीचा उपचार व्यवस्थित चालू असल्याचं गोल्डी बहलने सांगितलं. “सोनालीला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल आणि सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तिची प्रकृती स्थिर असून कोणत्याही अडचणींशिवाय तिच्यावर सुरळीत उपचार सुरू आहेत. कॅन्सरशी लढण्याचा प्रवास खूप मोठा असून त्याची सुरुवात सकारात्मक झाली आहे,” असं ट्वीट गोल्डी बहलने केलं. गेल्याच महिन्यात सोनालीला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचे समोर आल आहे. स्वत: सोनाली बेंद्रेने त्याबाबतची माहिती ट्विटरवर दिली होती. सध्या ती अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. तसेच सोनाली लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तिचे लाखो चाहते प्रार्थना करत आहेत. काही दिवसांपूर्वीच सोनाली बेंद्रेने आपला न्यू लूक शेअर केला होता. त्यात तिने आपल्या लांबसडक केसांना कात्री लावली होती. सोनालीने त्याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले होते. कॅन्सरवरील उपचारावेळी केमोथेरपीदरम्यान केस गळतात. त्यामुळे खबरदारी म्हणून सोनालीने आधीच केस कमी केल्याचं सांगितलं जात होतं.