Gautami Patil : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नृत्यामुळे सध्या तमाशा कलावंत हैराण झाले आहेत. गौतमी पाटील जसा डान्स आणि हावभाव करते तसंच आम्ही देखील करावं,  अशी मागणी तमाशाची सुपारी घेऊन येणाऱ्यांकडून तमाशा कलावंतांकडे केली जात आहे. 


तमाशा कलावंत काय म्हणाले? 


प्रेक्षकांकडून होणाऱ्या या मागणीवर कलावंत नाराजी व्यक्त करत आहेत. प्रेक्षकांना गण गवळण, बतावणी, विनोद आणि वग हे कार्यक्रम नको असून तोकड्या कपड्यातील डान्स हवा अशा शब्दात कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अशा प्रकारच्या मागण्यांमुळेच तमाशा लोप पावत असल्याची खंत तमाशा कलाकरांनी व्यक्त केली आहे.


गौतमी पाटील (Gautami Patil) जे सादर करते ती कला नसल्याचे तमाशा कलावंतांचे म्हणणं आहे. परंतु तमाशातदेखील प्रेक्षकांकडून गौतमी पाटीलचे व्हिडिओ दाखवले जातात आणि त्याच पद्धतीच्या डान्सची अपेक्षा प्रेक्षकांना आमच्याकडून असते त्याचे आम्हाला दुःख होते या भाषेत तमाशा कलावंतांनी भावना व्यक्त केल्या आहेत.


गौतमी पाटीलमुळे तमाशा कलावंत अडचणीत


प्रेक्षकांना फक्त गौतमी पाटील सारखा डान्स हवा आहे. त्यामुळे तमाशा लोप पावत चालला असल्याची खंत तमाशा कलावंतांनी व्यक्त केली आहे. फलटण तालुक्यातील तरडगाव येथे यात्रेनिमित्त वसंतराव नांदवळकर तमाशा आयोजित करण्यात आला होता. त्या कलाकारांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खंत व्यक्त केली आहे. दरम्यान जर हा प्रकार असाच चालू राहिला तर तमाशा हा तमाशा राहणार नाही तर ऑर्केस्ट्रा होईल आणि तमाशा लोप पावेल, अशी भीती कलाकारांनी व्यक्त केली आहे.


गौतमी पाटील नेहमीच आपल्या नृत्यामुळे चर्चेत असते. 'सबसे कातील गौतमी पाटील', अशी गौतमीची ओळख आहे. अल्पावधीतच तिने आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावलं आहे. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात तुफान राडा, नोटांची उधळण होत असते. गौतमी आपल्या नृत्याला अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप तिच्यावर अनेकांनी केला होता. पण तरीही तिच्या नृत्याची क्रेझ मात्र कायम आहे. तिने आपल्या सौंदर्याने आणि अदांनी संपूर्ण महाराष्ट्रातील गावागावांमधील तरुणांना भूरळ घातली आहे. नृत्यांना वेड लावल्यानंतर नृत्यांगणा आता अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा 'घुंगरु' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 



संबंधित बातम्या


Sadanand More : गौतमीने लावणीची संस्कृती बिघडवली अन् इंदुरीकर महाराजांनी...;सदानंद मोरेंची खोचक टीका