मुंबई : सध्या बॉलिवूडसह सोशल मीडियावर छत्रपती संभाजी महाराजांच्या (Sambhaji Maharaj) जीवनावर आधारीत शौर्य आणि बलिदानाची कथा साकारलेल्या छावा सिनेमाची धूम पाहायला मिळत आहे. सिनेमागृहात, चर्चेत, सोशल मीडियावर आणि गप्पांमध्येही छावा सिनेमावर चर्चा झडत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्याप्रती योगदान आणि बलिदानाचा इतिहास अभिमानाने सांगितला जात आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील छावा सिनेमा अतियश उत्तम असल्याचं म्हटलं आहे. तर, अनेक मराठी, हिंदी सेलिब्रिटी देखील छावा सिनेमाचं आणि अभिनेता विकी कौशलचं भरभरुन कौतुक करताना दिसून येत आहेत. त्यातच, माजी क्रिकेटर आकाश चोप्रानेही (Akash chopra) छावा सिनेमा पाहिल्यानंतर बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. तर, टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने (Gautam Gambhir) ट्विट करुन छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढताना मातृभूमीसाठी निस्सीम भक्ती म्हणजे संभाजी महाराज असं म्हटलं आहे.
आज 'छावा' पाहिला. शौर्य, निस्वार्थीपणा आणि कर्तव्याच्या जाणिवेची अविश्वसनीय कथा, अशा शब्दात आकाश चोप्राने छावा सिनेमा पाहिल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या भावना व चित्रपटाचे विश्लेषण केलं आहे. तसेच, आपल्याला एक प्रश्नही पडल्याचे त्यांनी म्हटले. आम्हाला शाळेत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अजिबातच का शिकवले गेले नाही? शाळेतील शिक्षणात कुठेही त्यांचा उल्लेख नाही. अकबर हा एक महान आणि न्यायी सम्राट कसा होता हे आम्ही शाळेत शिकलो. तर, राजधानी दिल्लीत औरंगजेब रोड नावाचा प्रमुख रस्तादेखील आहे. हे का आणि कसे झाले?, असा सवाल आकाश चोप्राने चित्रपट पाहिल्यानंतर विचारला आहे. तर,गौतम गंभीरने ट्विट करुन संभीराजेंचं दोनच शब्दात त्यांच्या स्वराज्याप्रतीच्या समर्पणावर भाष्य केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज- मातृभूमीची निस्सीम भक्ती (Devontion to motherland) अशा शब्दात वर्णन केलं आहे. दरम्यान, गौतम गंभीर आणि आकाश चोप्रा दोघांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, छावा सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून गेल्या 4 दिवसांत चित्रपटाने 150 कोटींचा टप्पा गाठला असून अद्यापही चित्रपटागृहात चाहत्यांची गर्दी उसळताना दिसून येत आहे. चित्रपटातील अनेक सीन अंगावर शहारे आणणारे असून चित्रपटाचा शेवट हा आपल्या राजाचे होणारे हाल पाहून डोळ्यातून आपसूकच अश्रू ढाळणार आहे. मात्र, छावा सिनेमामुळे छत्रपती संभाजीराजांचे बलिदान आणि त्यांचा इतिहास आत्ताच्या पिढीपर्यंत दृकश्राव्य माध्यमातून पोहोचला आहे.