Rutuja Bagwe On Kalavantancha Ganesh : गणपती बाप्पाचं प्रत्येकासोबत एक वेगळं नातं असतं. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींसाठीही बाप्पा खूप खास असतो. अभिनेत्री ऋतुजा बागवेसाठी (Rutuja Bagwe) यंदाचा गणेशोत्सव खूप खास आहे. अभिनेत्री बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक गोष्ट करते. 


एबीपी माझाशी बाप्पाबद्दल बोलताना ऋतुजा बागवे म्हणाली,"कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पाची पूजा करतो किंवा त्याच्या नावाचा जयघोष करतो. मीदेखील कोणत्याही कामाची सुरुवात करताना सर्वात आधी बाप्पाचं दर्शन घेते किंवा त्याच्या नावाचा जयघोष करते. बाप्पा कायम माझ्या पाठीशी आहे हे मला माहिती आहे. बाप्पा चराचरात आहे आणि मी माझ्या कामात देव शोधते. बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक गोष्ट करण्यावर माझा भर असतो". 


अन् 'तो' प्रयोग बाप्पानेच माझ्याकडून करून घेतला


ऋतुजा बागवे पुढे म्हणाली,"देवबाप्पा पाठीशी आहे, असं मला दररोज वाटतं. तोच कर्ता आहे आणि आपण फक्त निमित्तमात्र आहोत. पण एकदा 'अनन्या' या माझ्या नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि प्रयोगाच्या मध्यांतरीच्या आधीच्या सीनला माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली. पुढचे सर्व सीन पायाने करायचे होते. त्यावेळी मी फक्त देवबाप्पाचं नाव घेतलं आणि स्वत:ला झोकून दिलं. अखेर तो प्रयोग मी पूर्ण करू शकले. मला वाटतं बाप्पानेच तो प्रयोग माझ्याकडून करून घेतला". 


ऋतुजा बागवेसाठी 'हा' गणेशोत्सव ठरला स्पेशल


आठवणीतल्या गणेशोत्सवाबद्दल बोलताना ऋतुजा बागवे म्हणाली,"जेव्हा मी पहिल्यांदा मोदक करायला शिकले तो गणेशोत्सव माझ्यासाठी खूप खास आहे. पाचवी-सहावीत असताना स्वत:च्या हाताने लालबागच्या राजासाठी उकडीचे मोदक बनवले होते. ते वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे. त्यानंतर आजत्यागत दरवर्षी स्वत:च्या हाताने उकडीचे मोदक करुन राजाला नेते". 


सर्वांनी बिनदास्त मोदक खायला हवेत; ऋतुजा बागवेचा चाहत्यांना सल्ला


ऋतुजा बागवे म्हणाली,"गणेशोत्सवात मी डाएट करत नाही. मला वाटतं घरातला सकस आहार योग्यवेळी केला  तर आपण निरोगी राहतो. मोदक खायला मला खूप आवडतं. ते खूप पौष्टिक असतात. मोदकात गूळ, तांदळाचं पीठ, नारळाचं खोबरं आणि साजूक तूप असतं. या चारही गोष्टी शरीरासाठी खूप गरजेच्या आहेत. त्यामुळे सर्वांनीच बिनदास्त मोदक खायला हवेत. मला मोदकांवर ताव मारायला आवडतं". 


ऋतुजा पुढे म्हणाली,"यंदाचा गणेशोत्सव खूप स्पेशल आहे. खरंतर माझ्या घरी गणपती बसत नाही. पण यंदा मी माझा मित्र श्रेयस राजेच्या घरी आरास बनवण्यापासून विसर्जनापर्यंत संपूर्ण गणेशोत्सव साजरा केला. यंदा मी पहिल्यांदाच विसर्जनला गेले होते. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मला वाटतं बाप्पाकडे विशेष काही मागायची गरज नाही. त्याचं लक्ष आहे. आपल्याला योग्यवेळी योग्य ती गोष्ट तो देतच असतो. त्यामुळे मी त्याचे फक्त आभार मानते आणि मला माणूस म्हणून उत्तम ठेव, सदबुद्धी दे एवढच मागते". 






संबंधित बातम्या


Prathamesh Parab : बाप्पाच्या आशीर्वादासाठी जशी गर्दी होते तशी आमच्या सिनेमासाठीही व्हावी; प्रथमेश परबचं बाप्पाकडे मागणं