Aditi Govitrikar: ग्लॅमरच्या झगमगटात अनेक अभिनेत्री स्वतःला उत्तमपणे कॅरी करताना दिसतात. मात्र अनेकदा या झगमगटाच्यामागे अनेक गैर कृत्य, विचित्र घटना आणि धक्कादायक अनुभव आलेले असतात. बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली मराठी अभिनेत्री अदिती गोवित्रीकरला कोणत्याही ओळखीची गरज नाही. मात्र अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अदितीने आपल्या आयुष्यातील अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी अनुभव उघड करत सगळ्यांनाच हादरवून टाकलं आहे.

Continues below advertisement

2002 साली सोच या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अदितीने 16 डिसेंबर, पहेली, दे दना दन अशा चित्रपटांत काम केलं आहे. तसंच बिग बॉस 3 आणि खतरों के खिलाडीसारख्या रिअॅलिटी शोजमध्येही ती झळकली होती. 2001 मध्ये तिने मिस वर्ल्डचा मान मिळवला होता.

इंडस्ट्रीत अपेक्षित संधी मिळाली नाही

अदितीने सांगितलं की, 2001 मध्येच मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स बनलेल्या लारा दत्ता आणि प्रियांका चोप्राला मोठ्या संधी आणि लोकप्रियता मिळाली. मात्र स्वतःच्या बाबतीत तसं काहीच घडलं नाही, याचं तिला आजही खंत आहे.

Continues below advertisement

वडिलांच्या मित्राकडूनच गैरवर्तन

हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत अदितीने लहानपणीच्या एका भीषण अनुभवाचा खुलासा केला. ती म्हणाली " खरं सांगायचं तर, जर तुम्ही मला सुरक्षिततेबद्दल विचारले तर, माझ्याबाबत पनवेलमध्ये जास्त त्रासदायक घटना घडल्या. तिथे मला काही वाईट अनुभव आले. त्या समजून घेण्यासाठी मला बराच वेळ लागला. मी मोठी होईपर्यंत मी त्याबद्दल बोलले नाही. मी जेमतेम सहा-सात वर्षांचे होते. गुन्हेगारांपैकी एक माझ्या वडिलांचा मित्र होता, तर दुसऱ्या घटनेत तो एक अनोळखी व्यक्ती होता.

सार्वजनिक ठिकाणी असुरक्षिततेचा अनुभव

अदितीने पनवेलमध्ये राहतानाचे अनुभवही सांगितले. तिथे तिला अनेक त्रासदायक घटनांना सामोरं जावं लागलं. पुढे शिक्षणासाठी मुंबईत येताना सुरक्षिततेची भीती कायम होती. ती म्हणाली,“मी बारावीला असताना दादरला क्लाससाठी बसने जायचे. लोकल ट्रेन हा पर्याय नव्हता. सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करताना स्वतःला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधाव्या लागायच्या.”

अदितीने सांगितलं की ती दोन्ही बाजूंना मोठ्या बॅगा ठेवायची. त्यात हार्डबोर्डची पुस्तकं ठेवून ती जणू ढालसारखी वापरायची.“सीट मिळाली तर दोन्ही बाजूंना बॅगा ठेवायचे, जेणेकरून कोणी जवळ येऊ नये. तीच माझी सुरक्षा होती.”

तो धक्का आयुष्यभर राहतो

अदिती म्हणाली, “एका घटनेत तर कुटुंबातीलच ओळखीचा माणूस होता. इतक्या लहान वयात काय घडलं हे पूर्ण कळतही नाही. पण अपमान झाल्याची, काहीतरी चुकीचं घडल्याची भावना मनात घर करून बसते. तो धक्का कधीच पूर्णपणे जात नाही.”