मुंबई : पायरसी हे सिनेमांना लागलेलं ग्रहण आहे. विशेषत: चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी तो ऑनलाईन लीक होत असल्याने अनेक दिग्दर्शक याचा धसका घेतात. आता 'राज रिबूट' हा सिनेमाही ऑनलाईन लीक झाला आहे. ही बाब समजल्यानंतर निर्माता मुकेश भट, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
विक्रम भट दिग्दर्शित 'राज रिबूट' हा चित्रपट मंगळवारी रात्री ऑनलाईन लीक झाला आणि ट्विटरवर ट्रेण्ड झाला. सोशल मीडियावर अनेकांनी सांगितलं की, हा सिनेमा ऑनलाईन उपलब्ध आहे. राज रिबूट 16 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
"संपूर्ण चित्रपट नाही, तर त्यामधील एक छोटी क्लिप लीक झाली आहे. रिलीजसाठी सिनेमाची प्रिंट परदेशात पाठवण्यात आली आहे. या क्लिपमध्ये सेंसर कट नाही आणि यामधील आवाजही स्पष्ट नाही. कोणीतरी स्मार्टफोनवर स्टूडियोतच सिनेमा शूट करुन ऑनलाईन लीक केला असावा," असं निर्माता-दिग्दर्शक विक्रम भट यांनी स्पष्ट केलं.
या घटनेनंतर इम्रान हाश्मीने ट्वीट करुन प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं.