Rajkummar Rao : भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India)  अभिनेता राजकुमार रावची (Rajkummar Rao)  नॅशनल आयकॉन (National Icon) म्हणून नियुक्ती करणार आहे. 26 ऑक्टोबर 2023 रोजी त्याची नियुक्ती करण्यात येईल. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अभिनेता राजकुमार राव यांची राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती करणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

भारतीय निवडणूक आयोगाकडून राजकुमार राववर खास जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. नॅशनल आयकॉन म्हणून त्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. येत्या 26 ऑक्टोबरला गुरुवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल.

भारतातील पाच राज्यांमधील 161 दशलक्षाहून अधिक लोक पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करतील, अशी घोषणा भारताच्या निवडणूक आयोगाने या महिन्याच्या सुरुवातीला केली. आता विधानसभा निवडणुकीत मदतान करण्याचं आवाहन करताना अभिनेता दिसणार आहे. राजकुमार राव त्याला मिळालेल्या प्रत्येक भूमिकेला 100% देत असतो. आता ही नवी जबाबदारीदेखील तो चोख बजावेल.

'या' राज्यांमध्ये होणार निवडणुका

विधानसभेच्या छत्तीसगडमध्ये  (Chhattisgarh) 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि तेलंगणामध्ये  (Telangana) 17 आणि 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) आधी 23 नोव्हेंबरला मतदान होणार होते. पण  आता  ते 25 नोव्हेंबरला  होणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, छत्तीसगड,मध्य प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थान या राज्यांमधील निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या विधानसभा निवडणुका म्हत्त्वाचं काम करणार आहेत. 

नॅशनल आयकॉन लोकांना मतदानाबाबत जागरूक करतात. त्यांच्या सांगण्यावरुन जास्तीत जास्त मंडळी मतदान करतात. राजकुमारआधी ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला आपला नॅशनल आयकॉन बनवले होते. भारतात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अधिकाधिक लोकांनी मतदानात सहभागी व्हावे अशी निवडणूक आयोगाची इच्छा आहे. तरुण मंडळींवर त्यांचा फोकस आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, निवडणूक आयोग एखाद्याची आपला राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती करतात तेव्हा त्या सेलिब्रिटीला निवडणूक आयोगासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करावी लागते. तीन वर्षांसाठीचा हा करार असतो. नियुक्ती करण्यात आलेल्या सेलिब्रिटीला जाहिरातींद्वारे, तसेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे किंवा इतर कार्यक्रमांद्वारे लोकांना मतदानाविषयी जागरुक करावे लागते.

संबंधित बातम्या

Stree 2 : ओ स्त्री रक्षा करना! 'स्त्री 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; राजकुमार रावने केली रिलीज डेट जाहीर