Dr. Vilas Ujawane : 'वादळवाट' (Vadalvaat) फेम अभिनेते, डॉ. विलास उजवणे (Dr. Vilas Ujawane) गेल्या सहा वर्षांपासून ब्रेन स्ट्रोक या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. या आजाराचा सामना करताना त्यांचे सर्व पैसे खर्च झाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. ते यातून बाहेर पडावे यासाठी सध्या मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार आर्थिक मदतीचं आवाहन करत आहेत. 


ब्रेक स्ट्रोकशी झुंज देताना डॉ. विलास उजवणे यांना आता हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी आणि उपचारासाठी त्यांना पैशांची खूप गरज आहे. त्यामुळे त्यांनी चाहत्यांकडे मदतीचं आवाहन केलं आहे. 



राजू कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर करत चाहत्यांना मदतीचं आवाहन केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे,मित्रांनो आमचा लाडका डॉक्टर मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेली सहा वर्षे ब्रेन स्ट्रोकशी झुंज देणारा हा वाघ थोडा थकला आहे. ब्रेन स्ट्रोकशी झुंज देताना त्याचे सर्व पैसे खर्च झाले आहेत. त्याच्यात सुधारणा होत होती. तो सेकंड इनिंग चालू करणार असं वाटत असताना नियती त्याच्या पुढे दोन मोठ्या आजारांचे निष्ठुर दान टाकून निघून गेली". 


राजू कुलकर्णी यांनी पुढे लिहिलं आहे,"डॉ. विलास उजवणेचे मोठे ऑपरेशन तातडीने करणे आवश्यक आहे. तसेच त्याला काविळचीदेखील लागण झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर सध्या ठाण्यातील एका मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्याकडच्या मेडिक्लेम आणि इतर पॉलिसीदेखील संपुष्टात आल्या आहेत. या चक्रव्युहातून अभिमन्यूची सुटका होण्यासाठी आपण सर्व मित्रांनी खारीचा का होईना वाटा उचलू!"


डॉ. विलास उजवणे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. वादळवाट, चार दिवस सासूचे अशा गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. हरहुन्नरी आणि दिलखुलास अभिनेते म्हणून ते ओळखले जात. मालिकांसह त्यांनी नाटकातदेखील काम केलं आहे. डॉ. विलास उजवणे यांच्या मदतीसाठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार धावून आले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते चाहत्यांना मदतीचं आवाहन करत आहेत. तसेच डॉ. विलास उजवणे यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 


संबंधित बातम्या


Entertainment News Live Updates 13 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!