Dr Priya Passes Away: गेल्या काही दिवसांपासून मल्याळम चित्रपटसृष्टीमधून धक्कादायक घटना समोर येत आहे. अभिनेत्री रंजूषा मेनन (Renjusha Menon) ही तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीनं जगाचा निरोप घेतला आहे. करुथामुथू सारख्या शोमध्ये दिसलेली अभिनेत्री डॉ प्रियाचे (Dr Priya) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 35 वर्षीय प्रियाने मंगळवारी (31 ऑक्टोबर) एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तेव्हा ती आठ महिन्यांची गरोदर होती. तिच्या निधनानं मल्याळम मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
प्रियाच्या निधनानंतर अनेकांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता किशोर सत्या याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करुन प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, 'मल्याळम टेलिव्हिजन क्षेत्राला धक्का देणारा आणखी एक अनपेक्षित मृत्यू. काल हृदयविकाराच्या झटक्याने प्रियाचा मृत्यू झाला. ती 8 महिन्यांची गर्भवती होती. तिचे बाळ आयसीयूमध्ये आहे.तिला इतर कोणतीही आरोग्य समस्या नव्हती. काल ती रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. तेव्हा अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला. प्रियाच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या एकुलत्या एक मुलीच्या निधनानं ती खूप हादरली आहे.'
'देव अशा चांगल्या लोकांसोबत इतकं क्रूरपणे का वागत आहे? रंजूषाच्या निधनानंतर, आणखी एक मृत्यू. जेव्हा 35 वर्षांचा माणूस जग सोडून जातो तेव्हा शोक देखील व्यक्त कसा करावा? हे कळत नाही. प्रियाच्या नवऱ्याला आणि आईला या संकटातून कसे बाहेर काढायचे, माहीत नाही. त्यांच्या मनाला बळ मिळो.' असंही किशोरनं पोस्टमध्ये लिहिलं. किशोर सत्यानं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे. प्रिया ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. करुथमुथू या लोकप्रिय शोमध्ये तिने किशोरसोबत स्क्रीन शेअर केली होती.लग्नानंतर तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्याचे दिसले. प्रियाही डॉक्टर होती.
अभिनेत्री रंजूषा मेनन ही काही दिवसांपूर्वी तिरुअनंतपुरममधील (Thiruvananthapuram) तिच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळली. सोमवारी (30 ऑक्टोबर) सकाळी तिचा मृत्यू झालाय.
इतर महत्वाच्या बातम्या:
Renjusha Menon Found Dead: अभिनेत्रीचं वयाच्या 35 व्या वर्षी निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह