मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या 'गोलियोंकी रासलीला- राम लीला' चित्रपटात दीपिका आणि रणवीर सिंग यांची जोडी प्रचंड गाजली. बॉलिवूडमधील रोमांचक प्रेमकथांमध्ये 'रामलीला' सिनेमाचं नाव आवर्जून घेतलं जातं, तसंच रणवीर-दीपिकाच्या भूमिकेचंही कौतुक केलं जातं. मात्र राम आणि लीला यांच्या भूमिकेसाठी भन्सालींची पहिली पसंती ना दीपिकाला होती, ना रणवीरला.
पाकिस्तानी अभिनेता इम्रान अब्बासची या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी निवड झाली होती. इम्रान अब्बास म्हणजे करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटात अनुष्का शर्माच्या बॉयफ्रेण्डची भूमिका साकारणारा कलाकार. मात्र करारातील काही गोष्टींमुळे इम्रानने रामलीलातील भूमिका नाकारली होती.
दुसरीकडे, दीपिकाने साकारलेली लीलाची भूमिका बॉलिवूड दिवा करिना कपूरला ऑफर करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी करिनाने करण जोहरच्या 'गोरी तेरे प्यार में' सिनेमासाठी डेट्स दिल्या होत्या. दुर्दैवाने हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.
इम्रान-करिना 'रामलीला'त कमाल दाखवू शकले असते का, हा वेगळा प्रश्न. मात्र रणवीर-दीपिकाला पाहणं चाहत्यांसाठी पर्वणी होती. दीपिकाला या भूमिकेसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
रामलीला नंतर मात्र भन्साळी दीपिका-रणवीरच्या प्रेमातच पडले. बाजीराव मस्तानी, पद्मावती अशी दोघांच्या सिनेमांची रांगच लागली.15 नोव्हेंबर 2017 रोजी या सिनेमाने चार वर्ष पूर्ण केली. त्यानिमित्ताने या गोष्टींना उजाळा मिळाला.