न्यूयॉर्क : नियतीचा खेळ कधीकधी किती क्रूर असतो याचं ताजं उदाहरण हॉलिवूडमध्ये पाहायला मिळालं. स्टार वॉरची प्रख्यात अभिनेत्री केरी फिशरचं दोनच दिवसांपूर्वी (27 डिसेंबर) निधन झालं. पण त्यानंतर 24 तासांच्या आतच केरीच्या आई आणि अभिनेत्री डेबी रेनॉल्ड्स यांचाही हृदयविकाराच्या झटकाने मृत्यू झाला.  त्या 84 वर्षांच्या होत्या.

दोनच दिवसांपूर्वी केरी फिशर यांना विमान प्रवासादरम्यानच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्या 60 वर्षांच्या होत्या.

बेवर्ली इथल्या राहत्या घरी डेबी रेनॉल्ड्स बेशुद्ध पडल्या. त्यानंतर डेबी यांना सेडार्स-सीनोई मेडिकल सेंटर’मध्ये दाखल करण्यात आलं. पण तिथे त्यांची प्राणज्योत मालवली. 'मला केरीसोबत राहायचंय,' हे डेबी यांचे शेवटचे शब्द होते, अशी माहिती डेबी यांचा मुलगा टॉड फिशरने  दिली.

डेबी रेनॉल्ड्स यांचं खरं नाव मॅरी फ्रान्सेस रेनॉल्ड्स होतं. मात्र सिनेमासाठी साईन करताना वॉर्नर ब्रदर्सने मॅरी यांना डेबी नावं दिलं. सिंगिन इन द रेन’ (1952) मध्ये काम केल्यानंतर आणि पॉप कलाकार एडी फिशर यांच्याशी लग्न केल्यानंतर काही काळातच डेबी अमेरिकेत अतिशय लोकप्रिय झाल्या.

1964 मधील 'द अनसिंकेबल मॉली ब्राऊन’ या सिनेमासाठी डेबी रेनॉल्ड्स यांना पहिलं आणि एकमेव ऑस्कर नामांकन मिळालं होतं. आपल्या अभिनयाने छाप सोडलेल्या मायलेकींच्या लागोपाठ झालेल्या मृत्यूने हॉलिवूड हळहळलं आहे.