Dadasaheb Phalke:  सध्या 2D,3D सारख्या चित्रपट प्रेक्षकांना पहायला आवडतात. वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे चित्रपट प्रेक्षक बघतात. विविध टेक्नोलॉजीचा, VFX चा वापर सध्या चित्रपटांमध्ये सहजपणे चित्रपट निर्माते करतात. पण सध्या भारतातील प्रेक्षक चित्रपट पाहू शकत आहेत, ते केवळ एका व्यक्तीमुळेच. ती व्यक्ती म्हणजेच दादासाहेब फाळके.(Dadasaheb Phalke) ज्या काळात केवळ नाटक अन् लोककलेमधून भारतातील लोकांचे मनोरंजन केले जात होते, त्याच काळात दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीचे तंत्र भारतात आणून भारतीयांना चित्रपटाची ओळख करुन दिली. म्हणूनच दादासाहेब फाळके यांना 'भारतीय चित्रपसृष्टीचे जनक' असं म्हटलं जातं. चित्रपटनिर्मितीसाठी दादासाहेब फाळके यांनी सर्वस्व वाहिले होते. त्यांचे आयुष्य हे देखील एका चित्रपटाप्रमाणेच होते. एखाद्या चित्रपटात एका नायकाच्या आयुष्यात जशी संकटं किंवा अडथळे येतात, त्याच प्रमाणे दादासाहेबांना देखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला होता. जाणून घेऊयात धुंडिराज गोविंद फाळके  उर्फ दादासाहेब फाळके यांच्याबद्दल...


सर जे.जे स्कूल ऑफ आर्टमध्ये घेतले शिक्षण
धुंडिराज गोविंद फाळके  उर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी त्र्यंबकेश्वर येथे झाला. शालेय शिक्षण संपल्यावर 1885 मध्ये दादासाहेब फाळके यांनी सर जे.जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर ते बडोदा येथे शिल्पकला, छायाचित्रण इत्यादी गोष्टी शिकण्यासाठी गेले.  


एक मुकपट पाहिला अन् चित्रपट निर्मितीचा लागला छंद 
"लाईफ ऑफ ख्रिस्त" हा मुकपट पाहिल्यानंतर दादासाहेब यांच्यामध्ये चित्रपट निर्मितीची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी  राजा हरिश्चंद्र या मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. दादर येथे या चित्रपटाचा सेट उभारण्यात आला होता. तो 3 मे 1913 या दिवशी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रेक्षकांना पहिल्यांदा दाखवण्यात आला. दादासाहेब फाळके यांची पत्नी सरस्वतीबाई यांनी देखील त्यांना चित्रपट निर्मिती करण्यासाठी साथ दिली. 


पत्नीचे दागिने विकले, कर्ज घेतलं
राजा हरिश्चंद्र हा चित्रपट केवळ 20 मिनीटांचा चित्रपट होता पण या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान दादासाहेब यांना अनेक अडचणींचा समना करावा लागला. त्याकाळात चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या तांत्रिक वस्तू या अतिशय महाग होत्या या वस्तू घेण्यासाठी दादासाहेब फाळके यांनी कर्ज काढले होते. तसेच आर्थिक अडचण जाणवल्यामुळे दादासाहेब फाळके यांनी पत्नीचे दागिने देखील विकले. 


दादासाहेब फाळके यांच्या नावानं भारतीय चित्रपसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणाजेच दादासाहेब फाळके पुरस्कार हा कलाकारांना दिला जातो. 1969 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात झाली.  हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालय खात्यातर्फे दिला जातो. दादासाहेब फाळके यांच्यावर एका चित्रपटाची निर्मिती देखील करण्यात आली आहे. हरिश्चंद्रची फॅक्टरी असं त्या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात दादासाहेब फाळके यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 


Dada Saheb Phalke Award : देविका रानी यांना मिळाला पहिला 'दादासाबेब फाळके पुरस्कार'; जाणून घ्या संपूर्ण यादी...