मुंबई : कोविडने सगळ्यांना गप्प घरात बसवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिला लॉकडाऊन मार्च 2020 मध्ये जाहीर केला. त्यानंतर पुढचे काही महिने संपूर्ण देश घरात होता. कालांतराने अनलॉकिंगची प्रक्रिया सुरु झाली. पण थिएटर्स बंद होती. या सगळ्याचा परिणाम मराठी चित्रपट निर्मितीवर झाला आहे. मराठीमध्ये दरवर्षी जवळपास 100 चित्रपट प्रदर्शित होतात. या सगळ्यांना ब्रेक तर लागला आहेच. शिवाय, कोरोनामुळे आर्थिक चक्र मंदावल्यामुळे अनेकांनी चित्रपट निर्मितीचा विचार काढून टाकला आहे.
याबद्दल बोलतााना पिकल एंटरटेन्मेंट या चित्रपट वितरण कंपनीचे प्रमुख समीर दीक्षित म्हणाले की, "गेल्या वर्षीचेच चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेले नाहीत. त्याची वाट प्रत्येकजण पाहत आहे. यामध्ये अनेक मोठे सिनेमे आहेत. सरसेनापती हंबीरराव, पावनखिंड, डार्लिंग, झोंबिवली, झिम्मा, बळी, गोदावरी, चंद्रमुखी, एक नंबर अशा काही महत्त्वाच्या मोठ्या सिनेमांची प्रतीक्षा आहे."
काही सिनेमे पूर्ण आहेत, काहींची छोटी छोटी कामं राहिली आहेत. हे सगळं आंखो देखा असल्यामुळे नव्या चित्रपट निर्मितीत नव्या वर्षात कुणीच उतरलेलं नाही. टकाटक 2, रौंदळ, गाव आलं गोत्यात अन् 15 लाख खात्यात अशा काही सिनेमांचे मुहूर्त झाले. याचं प्रमाण इतकं कमी आलं आहे. याबद्दल नाव न सांगण्याच्या अटीवर निर्माता सांगतो, सिनेमे करायचे असतात. पण आता शक्य होत नाही. खरंतर नोटबंदीनंतरच याला ब्रेक लागला. आता तर कोरोनाने आणखी परिस्थिती आवळली आहे. कोरोना येण्याआधीही किमान 60 ते 70 सिनेमे वर्षानुवर्षं अडकून आहेत. काहींचे फायनान्सर गळले. काहींकडचे पैसे संपले. पण ते कोविडच्या आधीचं आहे. कित्येक सिनेमे 8 ते 9 वर्षं पडून आहेत. रांगेतले सिनेमे घ्यायचे तर गेल्या वर्षी तयार असलेले, पूर्ण तयार होऊ शकणारे असे सगळे आता थिएटर उघडायची, मोठा हिंदी सिनेमा यायची वाट बघत आहेत.
मराठी सिनेमांवरचा हा ब्रेक वाढणार आहे. कारण अनेक सिनेमांची गेल्या वर्षी राहिलेली कामं यंदा उरकण्याचा चंग बांधला गेला होता. पण आता पुन्हा एकदा लॉकडाऊन आल्यामुळे चित्रीकरण बंद असल्यामुळे हा ब्रेक वाढणार आहे. हीच परिस्थिती 2022 मध्येही असणार आहे. याशिवाय हिंदीची स्पर्धा आहे. उद्या परिस्थिती सामन्य झाल्यानंतर थिएटर्स उघडतील. मग हिंदीवाले या स्पर्धेत येतील. अशावेळी मराठी सिनेमाला टिकून राहावं लागणार आहे. बड्या माशांना चुकवून आपल्या सिनेमाची रिलीजची तारीख ठरवावी लागेल. यात 2022 ही निघून जाईल. सध्या तुंबून बसलेले किमान 100 सिनेमांचा निचरा व्हायला 2022 उजाडेल हे नक्की.