Click Mime Show : कुठल्याही प्रकारे शब्दांचा वापर न करता करण्यात आलेले नाट्य म्हणजे मूकनाट्य (Mime). गेल्या काही दिवसांपासून 'क्लिक' (Click) हे दोन अंकी मूकनाट्य रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहे. विपुल काळेने (Vipul Kale) या मूकनाट्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
'क्लिक'मध्ये नक्की काय आहे?
कला आणि वास्तव यात बारीक सीमारेषा असते आणि ती प्रत्येक कलाकाराला ओळखता यायला हवी. कलाकार म्हणून आपण जितके प्रगल्भ असतो तितकेच माणूस म्हणून आपण सुज्ञ आहोत का? हा प्रश्न प्रत्येक कलाकाराने स्वत:ला विचारायला हवा. अशाच दोन फोटोग्राफर्सवर (कलाकार) भाष्य करणारं हे नाट्य आहे.
दोघेही फोटोग्राफर्स माणसांच्या भावना कॅमेरामध्ये कैद करतात आणि हेच त्या दोघांचं वैशिष्ट्य आहे. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर दोनही फोटोग्राफर्सचा त्यांच्या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलतो. त्यांच्या या बदललेल्या दृष्टिकोणाचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम होतो, हेच 'क्लिक'मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असं विपुल म्हणाला.
मूकनाट्य करणारे अनेक कलाकार आहेत. खरंतर ज्या प्रमाणात मूकनाट्य केलं जातं त्या प्रमाणात ते पाहिलं जात नाही. पण हळूहळू यात बदल होत आहे. अनेक नाट्यवेडी तरुण मंडळी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मुकनाट्याचे प्रयोग सादर करत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात अनेक मूकनाट्य प्रेक्षकांच्या भेटीला येतील.
'क्लिक' पाहिल्यावर प्रेक्षक बाहेर जाताना काय घेवून जाईल?
विपुल म्हणाला,"आपण कोणत्याही क्षेत्रात का असेना आपल्या आतला माणूस मरता कामा नये. या व्यतिरिक्त 'क्लिक' पाहिल्यावर प्रेक्षक अनपेक्षिक अनुभव घरी घेऊन जातील. शारीरिक हालचाली आणि स्पर्शाचं महत्त्व लोकांना नव्याने कळेल. शब्दांविना फक्त हावभावांमधून, शारीरिक हालचालींमधून आणि स्पर्शातून मनातील सगळ्या भावना व्यक्त करता येऊ शकतात आणि तितक्याच परिणामकारकरित्या व्यक्त करता येतात हे लोकांच्या लक्षात येईल, हेच या नाटकाचं वेगळेपण आहे".
'मुकनाट्या'त शब्दांचा वापर करता येत नसल्याने संगीत आणि प्रकाशयोजनेला खूप महत्त्व आहे. 'क्लिक'चं संगीत आदित्य काळेने केलं असून युगांत पाटीलने या नाटकाची प्रकाशयोजना केली आहे. आयुष संजीव, मयुरेश खोले, पूर्वा कौशिक, अनिषा सबनीस, गौरव कालुष्टे, दीपक राठोड, पार्थसारथी डिकोंडा, सिद्धार्थ आखाडे, प्रतीक्षा फडके, अनुष्का गिते, गौरी कार्लेकर, केतन मोरे, संजना ताठरे, कोमल मयेकर आणि तेजस राऊत हे कलाकार या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
दिग्गजांनी कौतुक केलेलं मुकनाट्य
'क्लिक'च्या पहिल्या प्रयोगाला मुक्ता बर्वे, उमेश कामत, राजन भिसे, वैभव चिंचाळकर, मनीष दळवी, विनोद गायकर, विजय पगारे या कलाकारांनी हजेरी लावली होती. या दिग्गज मंडळींनी या नाटकाचं प्रचंड कौतुक केलं आहे. तसेच काहीतरी वेगळं करायची हिम्मत केल्याबद्दल शाबासकीदेखील दिली आहे.
पुढील प्रयोग :
कधी? 26 नोव्हेंबर
कुठे? प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर (मिनी) बोरिवली
संबंधित बातम्या