मुंबई : 'उडता पंजाब' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. तीन डिस्क्लेमर देत फक्त एका कटसह चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला 89 कट्स सुचवले होते.

 
48 तासांच्या आत उडता पंजाब चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र देण्याचे आदेश हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याच्या एका सीनला कात्री लावण्यास कोर्टाने सांगितलं आहे.

 
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी)च्या नियामांनुसार छायाचित्रणाच्या अधिनियमात सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले कट्स कुठेही बसत नाहीत. त्यामुळे चित्रपट सेन्सॉर करण्याचा बोर्डाला कोणताही अधिकार नाही. सीबीएफसीने केलेल्या दाव्यानुसार पंजाबची प्रतिमा मलिन करणारी किंवा भारताच्या अखंडतेत बाधा आणणारी कुठलीच गोष्ट चित्रपटात आढळत नाही, असंही हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे.

 
'सृजनात्मक स्वातंत्र्यावर अनावश्यक निर्बंध लादता कामा नयेत. कोणत्याही दिग्दर्शकाला त्याच्या चित्रपटातील आशयावर आदेश देऊ शकता येत नाहीत. एखादा सीन कापण्यास किंवा हटवण्यास किंवा बदलण्यास सुचवण्याचे सीबीएफसीचे अधिकार संविधानाला धरुन असावेत.' असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

 

चित्रपट चांगला किंवा वाईट हे ठरवण्याचा अधिकार प्रेक्षकांना आहे, सेन्सॉर बोर्डाने फक्त प्रमाणपत्र देण्याचं काम करावं, अशा शब्दात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कार्टाने सेन्सॉर बोर्डाला सुनावलं होतं. सिनेमाचे निर्माते अनुराग कश्यप यांनी सेन्सॉर बोर्डाविरोधात कोर्टात धाव घेतली होती.

 

उडता पंजाब हा चित्रपट 17 जूनला प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर, आलिया भट, करिना कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


संबंधित बातम्याः 


 

'उडता पंजाब'ला सेन्सॉरकडून 'ए' सर्टिफिकेट, आज हायकोर्टात सुनावणी


तुम्ही फक्त प्रमाणपत्रं द्या, निवडीचा अधिकार प्रेक्षकांना : हायकोर्ट


'उडता पंजाब' वाद: मुंबई हायकोर्टात आज काय झालं?