KK Birth Anniversary : गायक केके अर्थात कृष्ण कुमार कुननाथ (Singer KK) हे आज आपल्यात नाहीत. मात्र, त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून ते नेहमीच चाहत्यांच्या हृदयात जिवंत राहतील. केके यांनी हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. आजही त्यांच्या आवाजाची जादू जगभर पसरलेली आहे. केके यांनी गायलेली गाणी आजही लोकांना ऐकायला आवडतात. केके यांचा आज स्मृतिदिन आहे. याच वर्षी केके यांनी या जगाचा निरोप घेतला होता. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.


केके यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीत झाला होत. त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमधून झाले आणि दिल्ली विद्यापीठाच्या किरोडी माल कॉलेजमधून त्यांनी पदवी शिक्षण प्राप्त केले. केके यांनी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वीच अनेक जिंगल्स गायल्या होत्या. 1999च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी 'जोश ऑफ इंडिया' हे गाणेही गायले होते. त्याच्या या गाण्यात अनेक भारतीय क्रिकेटर्सही दिसले. यानंतर केकेने 'पल' या म्युझिक अल्बममधून गायक म्हणून करिअरला सुरुवात केली.


कोणतेही प्रशिक्षण न घेताही जिंकली चाहत्यांची मनं!


केके यांनी गाण्याचे किंवा संगीताचे कोणतेही अधिकृत शिक्षण घेतलेले नव्हते. ग्रॅज्युएशननंतर केके यांनी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अर्थात सेल्समन म्हणून नोकरीही केली आणि यादरम्यान त्यांनी 35 हजारांहून अधिक जिंगल्स गाण्यांचा रेकॉर्ड केला. 1999मध्ये त्यांनी त्यांचा ‘पल’ नावाचा पहिला अल्बम रिलीज केला. त्यांचा आवाज ऐकून प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी केके यांना बॉलिवूडमध्ये गाण्याची पहिली संधी दिली. 'माचीस' चित्रपटातील गाण्यांमधून गायक केके यांना विशेष लोकप्रियता मिळाली.


फिल्मफेअरवर कोरले नाव


1999मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल चुके सनम'  या चित्रपटामधील ‘तड़प तड़प के...’ या केके यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या गाण्याने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. या गाण्यासाठी त्यांना 2000 साली फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. चित्रपटांव्यतिरिक्त,  त्यांनी ‘जस्ट मोहब्बत’, ‘शाका लाका बूम बूम’, ‘हिप-हिप हुर्रे’ आणि ‘काव्यांजली’ यांसारख्या टीव्ही शोंची शीर्षक गीते देखील गायली आहेत.


हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन


31 मे 2022 रोजी, केके कोलकाता येथील एका संगीत कार्यक्रमात गाणे सादर करत होते. दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर हॉटेलमध्ये पोहोचल्यावर ते बेशुद्ध पडले. त्यावेळी केके यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. आज जरी ते आपल्यात नसले, तरी ते त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या हृदयात जिवंत राहणार आहेत.


संबंधित बातम्या


Singer KK Net Worth : लक्झरी लाईफ जगत होता केके, सोबत होता अलिशान गाड्यांचा ताफा


Singer KK Passes Away :  केके यांनी मराठी गाणही गायलं होतं; 'वेड लागले हे' गाणं ऐकलं का?