आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
आज मुंबईतील विलेपार्लेच्या पवन हंस स्मशानभूमीत अभिनेते सतीश शाह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . चित्रपट सृष्टीतील अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतीश यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Satish Shah: भारतीय चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शन विश्वातील ज्येष्ठ आणि बहुगुणी अभिनेते सतीश शाह (Satish Shah) यांच्या निधनाने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. तब्बल चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या कलाकाराने आपल्या अभिनयाने असंख्य भूमिका जिवंत केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतीश यांना श्रद्धांजली अर्पण केली. आज मुंबईतील विलेपार्लेच्या पवन हंस स्मशानभूमीत अभिनेते सतीश शाह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .त्यांच्या कुटुंबातील जवळचे सदस्य, मित्र आणि चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज यावेळी उपस्थित राहतील .
महानायक अमिताभ बच्चन म्हणाले...
अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाने बॉलीवूडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे .एक जवळचा सहकारी आणि दिग्गज अभिनेता गमावल्यानंतर बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही शोक आवरला नाही .बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सतीश शाह यांच्या निधनानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्या .ते म्हणाले 'आणखी एक दिवस .आणखी एक कार्य .आणखी एक शांतता ..आपल्यापैकी आणखी एक जण निघून गेला .सतीश शाह . प्रतिभावंत तरुण . अगदी लहान वयात आपल्याला सोडून गेला .या कठीण काळात इतक्या सामान्यपणे व्यक्त होता येणार नाही .प्रत्येक क्षणी आपणा सर्वांना असे संकेत मिळतो की शो मस्ट गो ऑन ' या जुन्या शब्दांचे पालन करण्यातच सहजता आहे .त्याप्रमाणेच आयुष्य पुढे जात राहिले पाहिजे . " असे ते म्हणाले .

तुम्ही दाखवलेला दयाळूपणा मी कधीच विसरू शकत नाही : ऋतिक रोशन
सतीश शाह यांच्या जाण्याने त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे . 'कहो ना प्यार है ' या ऋतिक रोशनच्या पहिल्या सिनेमात त्याने सतीश शाह यांच्यासोबत काम केलं होतं . त्यांची एक आठवण शेअर करत ऋतिक म्हणाला, प्रिय सतीश सर, तुमच्या आत्म्याला शांती लाभो .मी एक नवखा अभिनेता म्हणून सेटवर आलेलो त्यावेळी तुम्ही दाखवलेला दयाळूपणा कधीच विसरू शकत नाही . तुमची विनोदी शैली आणि तुमचा वारसा कायमच सर्वांना प्रेरणा देईल .कुटुंबीय आणि मित्रपरिवारप्रतिही मी संवेदना व्यक्त करतो असं ऋतिक म्हणाला .
Rest in peace, dear Satish Sir. I will never forget the kindness you extended to a newcomer like me on set. Your humour and legacy will continue to inspire. My deepest condolences to the family & friends. 🙏🏻
— Hrithik Roshan (@iHrithik) October 25, 2025
माधुरी दीक्षितनेही लिहिलं ..
हम आपके है कौन या चित्रपटात माधुरी दीक्षितने सहकलाकार म्हणून सतीश शाह यांच्यासोबत काम केलं होतं .त्यांच्या निधनानंतर तिनेही आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत .instagram वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणाली, " सतीश जी यांच्या निधनाने मला अतिव दुःख झालं आहे .मोठा धक्का बसलाय .एक महान व्यक्तिमत्व आणि अगणित हास्य सर्वांच्या चेहऱ्यावर त्यांनी फुलवलं .ज्या ज्या स्क्रीनवर त्यांनी काम केलं तिथे त्यांनी आनंद पसरवला .तुमच्यामुळे अनुभवलेलं हसू आणि आठवणींसाठी धन्यवाद .ओम शांती .. "असं ती म्हणाली .

याशिवाय अनेक अभिनेते, कलाकार दिग्दर्शक यांनीही सतीश शाह यांना श्रद्धांजली अर्पण केली .यात विवेक ओबेरॉय, आर माधवन, रणदीप हुडा, राजकुमार राव ,परेश रावल, करण जोहर अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे .
























