Bollywood : भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ज्यांना ‘पहिला सुपरस्टार’ मानलं जातं, त्या राजेश खन्नांच्या (Rajesh Khanna) लोकप्रियतेचा अंदाज लावणं अवघड आहे. ज्या प्रमाणात लोक त्यांच्यावर फिदा झाले, तसा स्टारडम आजवर कुणालाही मिळाला नाही. एकदा तर त्यांच्या चाहत्यांनी पुणं शहरच ठप्प करून टाकलं होतं! चाहत्यांच्या गर्दीतून बाहेर पडण्यासाठी पॅरामिलिटरी फोर्सला बोलवावं लागलं होतं.

Continues below advertisement

राजेश खन्नांना पाहताच एकच गर्दी उसळली 

60-70च्या दशकात राजेश खन्नांचा जबरदस्त दबदबा होता. अभिनेता-दिग्दर्शक सत्यजित पुरी यांनी या घटनेचा किस्सा सांगितला. सत्यजित पुरी त्या काळातील प्रसिद्ध चाइल्ड आर्टिस्ट होते आणि त्यांनी राजेश खन्नासोबत अनेक चित्रपट केले होते. पुरी म्हणाले, “राजेश खन्नांचा कॉल टाइम दुपारी 2 वाजता होता, पण ते सेटवर रात्री 8 वाजता पोहोचले. शक्ति सामंत सर रागाने संतापले आणि म्हणाले, ‘काका, तू काय आता मोठा स्टार झालास का?’ त्यावर राजेश खन्नांनी हसत आपल्या ड्रायव्हरकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, ‘त्याला विचारा काय झालं!’”

ड्रायव्हरने सांगितलं, “काका दुपारी साडेबारा वाजता पुण्यात पोहोचले, पण त्यांच्या आगमनाची बातमी समजताच रस्त्यावर गर्दी उसळली. हजारो चाहते रस्त्यावर उतरले, काही मुली गाडीच्या टायरलाच लटकल्या. शहरात ट्रॅफिक जाम झाला  परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि पॅरामिलिटरी फोर्सला बोलवावं लागलं. त्या दलानेच काकांना सुरक्षित बाहेर काढलं.” तेव्हा राजेश खन्ना म्हणाले होते, “मी आता पोहोचलोय, हेच नशीब समजा. अन्यथा मी रात्री 11 वाजेपर्यंतही इथे येऊ शकलो नसतो.”

Continues below advertisement

शेवटच्या प्रवासातही जमली लाखोंची गर्दी

राजेश खन्नांचं 2012 मध्ये दीर्घ आजारानंतर निधन झालं. त्यांच्या यकृतामध्ये इन्फेक्शन झालं होतं. ‘काका’च्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी इतकी गर्दी जमली की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यांच्या स्टारडमचा तो शेवटचा पुरावा ठरला. कारण मृत्यूनंतरही लोकांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात आदर होता.‘आराधना’, ‘आनंद’, ‘कटी पतंग’सारख्या हिट चित्रपटांनी राजेश खन्ना यांनी लाखोंच्या मनात घर केलं. त्यांच्या स्मितहास्यावर आणि रोमॅंटिक अंदाजावर चाहत्यांची भुरळ पडली होती. आज, त्यांच्या निधनानंतर दशक उलटलं असलं तरी त्यांचं नाव उच्चारलं की लोकांच्या चेहऱ्यावर आपोआप हास्य उमटतं.