मुंबई : करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या अभिनेत्री करीना कपूर ( Kareena Kapoor Khan ) आणि अभिनेत्री अमृता अरोरा (Amrita Arora) यांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्टीत अभिनेत्री आलिया भट्टदेखील (Alia Bhatt) सहभागी झाली होती. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाने तिला सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. पण 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होण्यापूर्वी आलियाने दिल्लीतील गुरुद्वारला भेट दिली. त्यामुळे होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने आलिया भट्ट विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु आता मुंबई महानगर पालिकेने आलिया भट्टला मोठा दिलासा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भट्टने क्वारंटाइन नियम तोडलेले नाहीत.
आलिया भट्ट काल रात्री चार्टड विमानाने मुंबईत दाखल झाली आहे. आलिया भट्ट हाय रिस्क रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने तिला सात दिवस होम क्वारंटाईन राहाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर पाच दिवसांतच आलिया दिल्लीत पोहोचली. आलियाने एका दिवसाच्या कामासाठी होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केले. दरम्यान आपण एका दिवसाच्या कामासाठी दिल्लीला जात असून आपला कोविड रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे आलियाने पालिकेला कळवले होते.
त्यानंतर आता सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आलियाने कोरोना नियमांचे उल्लंघन केलेले नाही. तिने वीलगीकरणाचे पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर सहाव्या दिवशी कोरोना चाचणी केली. तिची ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याशिवाय तिने बीएमसीला आपण एका दिवसासाठी मुंबईतून बाहेर जाणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे आलियावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
करण जोहरने आयोजित केलेल्या डिनर पार्टीत सहभागी झाल्यानंतर करीना कपूर, अमृता अरोरा, करिश्मा कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान यांना कोरोनाची लागण झाली होती. आलिया भट्ट देखील या पार्टीत सहभागी झाली होती. बॉलिवूडमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. दरम्यान संजय कपूरची पत्नी महीप कपूर, सलमान खानचा भाऊ अभिनेता सोहेल खानचा मुलगा योहान खानला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरनंतर आता त्यांची मुलगी शनाया कपूरलादेखील (Sonam Kapoor) कोरोनाची लागण झाली आहे. शनायाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
बॉलिवूडकर सूपर स्प्रेडर, अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरलादेखील कोरोनाची लागण